बाळासाहेब जवळकर

विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमा खापरे हे नाव चर्चेत आले आहे. जवळपास ३० वर्षांपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या खापरे यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पिंपरी-चिंचवड हेच केंद्रस्थानी राहिले आहे.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणून खापरे यांना सुरूवातीपासून ओळखले जाते. भाजपची फारशी ताकद नव्हती, त्या १९९७ ते २००७ या कालावधीत खापरे पिंपरी पालिकेच्या सभासद होत्या. चिंचवड प्रभागाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. स्थायी समितीच्या सदस्य तसेच पालिकेतील विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले. भाजपच्या संघटनात्मक पातळीवरही खापरे यांनी अनेक पदे भूषवली. सुरुवातीला त्या कोषाध्यक्ष होत्या. त्यानंतर, महिला मोर्चाच्या सचिव तसेच महिला मोर्चाच्या सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. गेल्या लोकसभा निवडणुकांवेळी सोलापूरच्या प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दोन वर्षांपूर्वी खापरे यांची महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यांच्या नियुक्तीवरून पक्षात नाराजीनाट्य घडले होते.
प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून खापरे यांचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय झाले होते. महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात खापरे यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने केली. विधानपरिषदेसाठी इच्छुकांची तीव्र चढाओढ सुरू होती, तेव्हा खापरे यांनी उमेदवारीची मागणी केली नव्हती. ओबीसी आणि महिला नेतृत्व या निकषांवर पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याचे भाजपमध्ये जवळपास निश्चित मानले जात होते. त्याचवेळी पडद्यामागे बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. अखेर, प्रदेशस्तरावरून खापरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अनपेक्षित सारे घडल्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

जमिनीवरील कार्यकर्ता…आमश्या पाडवी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर, खापरे यांनी बुधवारी चिंचवड येथे पत्रकारांशी संवाद साधला. विधान परिषदेची उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाच्या सर्व नेत्यांचे त्यांनी आभार मानले. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला अशाप्रकारे फक्त भाजपमध्येच न्याय मिळू शकतो. गोपीनाथ मुंडे आज हयात असते, तर ते खूपच खूष झाले असते. त्यांचे स्मरण होत असल्याचे खापरे यांनी नमूद केले. पंकजा मुंडे माझ्या नेत्या आहेत. त्यांच्यासमोर मी अतिशय छोटी कार्यकर्ती आहे. त्यामुळे त्यांना नाकारून मला संधी दिली, असे मी मानत नाही. पंकजाताईचे मन मोठे आहे. महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली, तेव्हाही पंकजाताई माझ्या पाठिशी होत्या व यापुढेही राहतील, याची खात्री असल्याचे खापरे यांनी नमूद केले.