प्रशासनाकडून पाच कोटींचा दंड वसूल
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि उर्वरित ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी न वापरणाऱ्या आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून आतापर्यंत पाच कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून कारवाई तीव्र करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मुखपट्टी न वापरणाऱ्या नागरिकांना ५०० रुपये, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रसृत के ले आहेत. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
दंडाची रक्कम वसूल करण्याचे अधिकार पोलीस, पोलीस मित्र, आरोग्य सेवक, महापालिका कर्मचारी यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार कारवाईची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
याबाबत विभागीय आयुक्त राव म्हणाले, ‘आतापर्यंत पुणे शहरात ७६ लाख रुपये, पिंपरी-चिंचवड शहरात दोन कोटी रुपये आणि ग्रामीण भागात दोन कोटी एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढील काळात शहरासह जिल्ह्य़ात सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुखपट्टी वापरणे आणि रस्त्यावर न थुंकणे या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरज नसल्यास गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, असे प्रशासनाचे आवाहन आहे.’