कालव्याच्या जागेवर शेकडो बेकायदा बांधकामे, प्रार्थनास्थळांचे अतिक्रमण

जलसंपदा विभागाच्या इशाऱ्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

उंदीर, घुशी, घोरपडींनी कालव्याचा पाया पोखरला

खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत शहरातून जाणाऱ्या २८ कि.मी. लांबी असलेल्या कालव्याच्या जागेवर शेकडो बेकायदा बांधकामे तसेच प्रार्थनास्थळांचे अतिक्रमण झाले आहे. एक वर्षांपूर्वी महानगरपालिकेने जलवाहिनीच्या कामासाठी कालव्यावरील काही अतिक्रमणे काढून टाकली. त्यामुळे भुसभुशीत झालेल्या जमिनीत उंदीर, घुशी आणि घोरपडींनी कालव्याचा पाया भुसभुशीत केल्यामुळे गुरुवारी कालवा फुटण्याची घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाने खडकवासला धरणाचे मुठा उजवा कालव्यासाठी पाणी सोडण्यात येणारे दोन दरवाजे बंद केले असून टिपर, पोकलेन यांच्या साहाय्याने चोवीस तासांत गळती बंद करण्यात येणार आहे.

खडकवासला धरणातून मुठा उजवा कालवा इंदापूपर्यंत असून तो २०२ कि.मी. लांबीचा आहे. त्यापैकी शहरातून २८ कि.मी. लांबीचा कालवा आहे. जलसंपदा विभागाच्या जागांवरील अतिक्रमणांचे गेल्या काही वर्षांत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये पर्वती, जनता वसाहत, हडपसर औद्योगिक वसाहत, मगरपट्टा, साडेसतरा नळी या ठिकाणी कालव्याच्या जागेत मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार जलसंपदा विभागाने महापालिकेला संबंधित अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिकेने काही झोपडय़ा हटवल्या होत्या. त्यानंतर उंदीर, घुशी, घोरपडींनी कालव्याच्या भराव क्षेत्रातील जमीन भुसभुशीत केल्याने कालव्यातील पाण्याला वेगळी वाट निर्माण होऊन गुरुवारी दुर्घटना घडली, अशी माहिती जलसंपदा विभागाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांनी दिली.

लष्कर आणि पर्वती जलशुद्धीकरण केंद्रांना वर्षांतील ३६५ दिवस पाणी देण्यात येत असल्याने कालव्याची दुरुस्ती करता येत नाही. तर, सध्या इंदापूरला शेतीसाठी बाराशे ते चौदाशे क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. शहरातून जाणाऱ्या २८ कि.मी.मधील तेरा कि.मी.वर कालव्याचा पाया खचला आहे. दहा मीटर लांबी आणि पाच मीटर उंच एवढा कालव्याचा पाया खचला असून गुरुवारच्या दुर्घटनेत पंचवीस लक्ष घनफूट पाणी वाहून गेले. कालवा दुरुस्तीच्या कामासाठी तीन लाख रुपये खर्च येणार आहे, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

कालव्याच्या जागेचे सर्वेक्षण होणार

खडकवासल्यापासून नांदेड सिटी, वडगाव बुद्रुक, स्वारगेट, लष्कर, रेसकोर्सच्या बाजूने (जमिनीखालून), हडपसर (मगरपट्टा सिटीला लागून), फुरसुंगी असा २८ कि.मी. लांबीचा कालवा शहरातून जातो. या ठिकाणी कालव्याच्या पर्यायाने जलसंपदा विभागाच्या जागेत झालेल्या अतिक्रमणांमुळे कालवा, भराव आणि पाया यांची क्षेत्रीय तपासणी (ऑन द स्पॉट) जलसंपदा विभागाकडून करण्यात येणार आहे. तपासणीत काही त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दूर करण्यात येतील, असे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत ता. ना. मुंडे यांनी सांगितले.