कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे आदेश; दुकानांची अचानक तपासणी करणार

खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या दुकानांची अचानक तपासणी केली जाणार आहे. बियाणे, खते आणि कीटकनाशके यांची बेकायदा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने निलंबित करून त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांनी दिले.

खरीप हंगामाच्या पूर्वतयारीनिमित्त साखर संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत खोत बोलत होते. कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह या वेळी उपस्थित होते. यंदा राज्यात खरीप हंगामात १५२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्यांचे नियोजन करण्यात आले असून त्याचा आढावा या वेळी घेण्यात आला.

खोत म्हणाले,की बेकायदा विक्री करणाऱ्यांचे परवाने निलंबित करून त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. खरीप हंगामासाठी बँकांनी केलेल्या पीक कर्ज पुरवठय़ाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दर आठवडय़ाला द्यावी लागणार आहे. क्रॉपसॅप योजनेत कृषी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. मंडल कृषी अधिकाऱ्यांबरोबर संबंधित विद्यार्थी हे पिकांवरील कीड आणि रोगांबाबतच्या सर्वेक्षणाचे काम करणार आहेत. गटशेती योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, याबाबतच्या अडचणी सोडवण्यासाठी ११ जून रोजी पुण्यात यशदा येथे बैठक होणार आहे.

राज्यात टंचाई नाही

राज्यात बियाणे आणि खते यांची टंचाई नाही, असे सांगून ते म्हणाले, की राज्यात कापूस आणि सोयाबीनचे प्रत्येकी ३६ लाख हेक्टर, भात आणि तूर प्रत्येकी १६ लाख हेक्टर, मका नऊ  लाख तीस हजार हेक्टर आणि तेलबियांचे ३९ लाख ६९ हजार हेक्टरवर पेरण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी ३६ लाख ५८ हजार टन खतांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, केंद्र सरकारने चाळीस लाख टन खतांचा पुरवठा मंजूर केला आहे.