पुणे शहरात करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीचं आयोजन केलं होतं. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याचसंदर्भातील माहिती पुण्यातील मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे.

प्रत्येक पदाधिकाऱ्यांसोबत किमान एक व्यक्ती जरी आला तरी या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला येणाऱ्यांची संख्या शंभर ते दीडशे होईल. त्यामुळे आजच्या गाठीभेटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं वागस्कर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तसेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात मोजक्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाईल. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष उपस्थित असतील असं वागस्कर यांनी सांगितलं आहे.

नियोजित दौऱ्यानुसार राज ठाकरे सकाळी मुंबईहून निघाले आणि ते पुण्यात पोहचले. पुण्यामध्ये नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या ४५ पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचं वाटप आणि आजी-माजी नगरसेवकांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र विभागीय आयुक्त आणि पालक मंत्री अजित पवार यांनी जी बैठक घेतली त्यानंतर त्यांनी आवाहन केलं आहे शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात यावीत तसेच गर्दी टाळावी. पुण्यामध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी एवढ्या लोकांना एकत्रित बोलवून पत्रं देणं योग्य दिसणार नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळले गेले पाहिजेत. म्हणूनच या भेटीगाठींचं नियोजन रद्द करण्यात आलं आहे, अशी माहिती वागस्कर यांनी दिली.

अजित पवार काय म्हणाले…

आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. विभागीय आयुक्त सौरभ राव तसंच केंद्राच्या पथकातील सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यात लॉकडाउन होणार नसल्याचं स्पष्ट केलं. अजित पवार यांनी पुणेकर तसंच राज्यातील जनतेला करोना संकट गांभीर्याने घेण्याची विनंती केली. जास्तीत जास्त लसीकरण कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असून केंद्राच्या आदेशाचं पालन करावं लागतं असं ते म्हणाले आहेत. काही बाबतीत नियमांचं पालन केलं जात नसल्याने नाईलाजास्तव आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत असं यावेळी अजित पवारांनी सांगितलं.