News Flash

पुण्यात पावसाचा शिडकावा;बारामती, शिरूरमध्ये जोरदार पाऊस

बारामती आणि शिरूर तालुक्यांमध्ये रविवारी जोरदार वारा आणि पावसाने हजेरी दिली

वीज पडल्यामुळे शेतमजूर महिला मृत्युमुखी

बारामती आणि शिरूर तालुक्यांमध्ये रविवारी जोरदार वारा आणि पावसाने हजेरी दिली. पुणे शहरातही ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा होऊन कमाल तापमानातही काहीशी घट झाली आहे. रविवारच्या अवकाळी पावसाने वीज पडून शिरूरमध्ये शेतात काम करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला, तसेच आणखी दोघेजण वीज पडल्यामुळे जखमी झाले, तर इंदापूर, बारामती व पुरंदरमध्ये या पावसामुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत आले आहेत. पुण्यात सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. संध्याकाळी शहराच्या अनेक भागात पावसाच्या एक-दोन सरी पडून गेल्या. शहराच्या कमाल तापमानातही लक्षात येण्याजोगी घट झाली आहे. पुण्यात रविवारी ३७.८ अंश कमाल तापमानाची नोंद झाली.

शिरूरमध्ये रविवारी दुपारीच जोरदार पावसासह गाराही पडल्या. तसेच जोराच्या वाऱ्यामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. शिरूर शहराचा वीज पुरवठा पावसामुळे खंडित झाला होता.शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील इनामगाव येथे अलका बबन थोरात (वय ४५) यांचा शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला. दुपारी साडेचारच्या सुमारास पाऊस येत असल्याने त्या कांदे झाकण्यासाठी शेतात गेल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यांना दवाखान्यात नेण्यात आले, परंतु तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. नागरगाव येथील अजित शेलार व उरळगाव येथील एक व्यक्ती अंगावर वीज पडून जखमी झाले.

अचानक आलेल्या पावसाने इंदापूर, बारामती व पुरंदर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक अडचणीत आले आहेत. बारामती शहर व तालुका परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. पावसामुळे सकल भागात पाणी साचले, तसेच काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 5:23 am

Web Title: rain in pune pune rain pune weather weather for pune
Next Stories
1 राज्यात पावसाळापूर्व सरींची शक्यता
2 ‘पुण्याची बससेवा ‘बायो-इथेनॉल’वर हवी’
3 Nayana Pujari case : संगणक अभियंता नयना पुजारी खून खटल्याचा आज निकाल
Just Now!
X