विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रॉक्टर्ड पद्धत

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे  अंतिम पूर्व स्तरावरील राहिलेल्या विषयांची (बॅकलॉग) आणि श्रेणीसुधार परीक्षा आजपासून (८ डिसेंबर) सुरू होत आहे. अंतिम वर्ष परीक्षांप्रमाणेच ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी न येण्यासाठी विद्यापीठाने कं बर कसली असून, ऑनलाइन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या प्रॉक्टर्ड पद्धतीचा वापर करण्यात येत आहे.

अंतिम वर्ष परीक्षांनंतर विद्यापीठाकडून अंतिम पूर्व स्तरावरील राहिलेल्या विषयांची (बॅकलॉग) आणि श्रेणीसुधार परीक्षा ८ ते २३ डिसेंबरदरम्यान घेण्यात येत आहे. २ लाख २८ हजार विद्यार्थी राहिलेल्या विषयांच्या परीक्षेसाठी, तर श्रेणीसुधार परीक्षेसाठी १७ हजार विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळापत्रकानुसार सकाळी नऊ ते बारा आणि सायंकाळी दोन ते पाच या वेळेत परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे लॉगीन होण्याच्या अडचणी येणार नाहीत, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.  परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी न येण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन बहुपर्यायी परीक्षा कशा पद्धतीने द्यावी याबाबत मार्गदर्शक सूचनाही विद्यार्थ्यांना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत, असेही डॉ. काकडे यांनी सांगितले.

वेळापत्रकात बदल : परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना एका दिवशी दोनपेक्षा जास्त विषयांची परीक्षा न होण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही दिवशी तीन विषयांची परीक्षा असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे वेळापत्रकात काही बदल करण्यात येत असल्याची माहिती डॉ. काकडे यांनी दिली.