मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा दर्शविताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी खासदार छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यावर टीका केली. त्यातील एका खासदाराला भारतीय जनता पक्षाने राज्यसभेवर कसे पाठविले, असा प्रश्नही आंबेडकर यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मराठा समाजाच्या वतीने १० ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना या मोर्चाला पाठिंबा दर्शविला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी दोन्ही राजांनी नेतृत्व करावे, अशी मागणी होत आहे. त्या संदर्भात आंबेडकर यांनी त्यांच्यावर टीका केली.

ज्यांना राज्य घटना माहित नाही, आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर सर्वाचे आरक्षण रद्द करा, अशी भूमिका ते घेतात. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना राज्यसभेवर कसे पाठविले, हा प्रश्न उपस्थित होतो, असे सांगून आंबेडकर म्हणाले की, संभाजीराजे यांनी आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे. मात्र आरक्षणापेक्षा ते अन्य गोष्टींना प्राधान्य देत आहेत.