पुण्यातील टीव्ही ९ वृत्तवाहिनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचं करोनामुळं बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील नव्यानं उभारण्यात आलेल्या कोविड केअर रुग्णायात उपचारांदरम्यान निधन झाले. त्यांची प्रकृती अधिकच बिघडत चालली असताना खासगी रुग्णालयात त्यांना उपचार घेता यावेत यासाठी पुण्यातील पत्रकारांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, ते आपल्या सहकारी मित्राचा जीव वाचवू शकले नाहीत. सध्याच्या परिस्थितीत वेळेत सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने पांडुरंग यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या बहिणीने केला आहे.

पांडुरंग यांच्या बहिणीने आपल्या भावाच्या मृत्यूला शासनालाच जबाबदार धरले आहे. प्रतिक्रया देताना म्हणाल्या, “सरकारी कोविड केअर सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा आहेत. या ठिकाणी अनागोंदी कारभार सुरु असून प्रशिक्षित डॉक्टर्स नाहीत. सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून कोविड सेंटर उभारले. मात्र, ते कार्डियाक अॅम्ब्युलन्स उपलब्ध करु शकले नाहीत. त्यामुळेच माझ्या भावाचा मृत्यू झाला.”

टीव्ही ९ या वृत्त वाहिनीत पुण्याचे प्रतिनिधी असलेले पांडुरंग रायकर पांडुरंग रायकर यांना २० ऑगस्ट रोजी थंडी वाजून येणे आणि तापाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर नेहमीप्रमाणे पांडुरंग यांनी स्थानिक डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले. दरम्यान, २७ ऑगस्टला त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर ते २८ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या आपल्या गावी गेले. मात्र, तिथेही त्यांना हा त्रास सुरुच होता. त्यामुळे त्यांची कोपरगावमध्ये अँटीजेन चाचणी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली.

दरम्यान, कोपरगावमध्येच पुढील चांगल्या उपचारांसाठी रूग्णालयात दाखल होण्यासाठी त्यांनी चौकशी केली. या रुग्णालयाने (नाव समजू शकले नाही) त्यांना ४० हजार रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितले. त्यानंतर रविवारी ३० जुलै रोजी रात्री त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी पुण्यात आणण्यात आलं आणि नव्याने उभारण्यात आलेल्या जंम्बो कोविड रुग्णालयात भरती केलं. या ठिकाणी त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावतच होती. त्यामुळे त्यांना आणखी चांगल्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दरम्यान, काल (मंगळवारी) त्यांच्या शरिरातली ऑक्सिजनची पातळी ७८ पर्यंत खाली गेली. ही चिंतेची बाब असल्याने पुण्यातील पत्रकार काल दिवसभर अनेक रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी बोलून व्हेंटिलेटर बेडसाठी प्रयत्न करीत होते.

दरम्यान, पांडुरंग यांच्या ऑक्सिजनच्या पातळीत सुधारणा होत ती ८५ पर्यंत गेली, ही सर्वांसाठीच काहीसी समाधानाची बाब होती. हळूहळू ऑक्सिजनची पातळी वाढेल असे सर्वांना वाटत होते. तेवढ्यात संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध झाला. मात्र, तिथे दाखल करण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका पाहिजे होती. मात्र, पहाटेपर्यंत त्यांना नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळू शकली नाही. जेव्हा मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. काही मिनिटांपूर्वी जम्बो रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले की, पांडुरंग यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने निधन झाले. हे समजताच पांडुरंग यांच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या पत्रकार सहकार्यांना धक्काच बसला. आपण एवढे प्रयत्न करूनही आपल्या सहकाऱ्याला वाचवू शकलो नाही, याची खंत सर्वांच्या मनात आहे.

पांडुरंग रायकर यांनी मागील सहा महिन्यांत करोनाच्या असंख्य बातम्या केल्या. त्यामध्ये सीईओपी मैदानावर जम्बो कोविड सेंटर सुरू होणार या बातमीचादेखील समावेश आहे. आज त्याच उभारलेल्या रुग्णालयात त्यांना मृत्यूला सामोरे जाण्याची वेळी आली. आजवर अनेककदा प्रसारमाध्यमांनी प्रशासनाकडे नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत, अशी मागणी केली होती. मात्र, याच ढिसाळ व्यवस्थेचा एक पत्रकार बळी ठरला असल्याची चर्चा आहे.