पुणे शहरातील बाबा भिडे पुलावर एक तरुण सेल्फी काढत होता. त्यावेळी त्याचा पाय घसरून पाण्यात पडला. मित्राला वाचविण्यासाठी दुसर्‍याने पाण्यात उडी मारली. मात्र तो देखील वाहून गेल्याची घटना घडली असून अग्निशामक कर्मचार्‍यांकडून त्या तरुणाचा शोध सुरू आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरण क्षेत्रात देखील दमदार हजेरी लावल्याने, धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे मुळा मुठा नदीमधून वाहत जाणारे पाणी पाहण्यास, आज संध्याकाळच्या सुमारास भिडे पुलाच्या तिथे तिघे मित्र आले होते.

त्या तिघांपैकी दोघे सेल्फी काढत होते. तेवढ्यात एकाच पाय घसरला आणि पाण्यात पडला. मित्र वाहत जात असल्याचे दिसताच मित्राने देखील त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तो देखील बुडला. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच घटनास्थळी धाव घेऊन त्या दोन तरुणाचा शोध सुरु केल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.