पुणे विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांचे अटेस्टेशन करण्यास नकार दिला जात असल्यामुळे पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना अटेस्टेशनसाठी धावाधाव करावी लागत आहे.
विद्यापीठामध्ये विविध अर्ज भरण्यासाठी, गुणपत्रके घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परिसरामध्येही येण्याचीही आवश्यकता भासू नये आणि एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांची सर्व कामे व्हावीत, या हेतूने विद्यापीठाच्या गेटवर विद्यार्थी सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आली. मात्र, तरीही विविध कामासाठी विद्यार्थ्यांना अजूनही विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये खेपा घालाव्या लागत आहेत. अर्ज भरण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून घेऊन अटेस्टेशन करून घेणे आवश्यक आहे. मात्र, विद्यार्थी सुविधा केंद्रामध्ये अटेस्टेशनची सुविधा नाही. विद्यापीठातील अधिकारीही अटेस्टेशन करून देण्यास नकार देत आहेत. विद्यापीठाच्या माहिती अधिकारी, जनसंपर्क प्रमुख आणि सुरक्षा विभाग प्रमुखांनी अटेस्टेशन करून द्यावे अशी सूचना कुलसचिवांनी लावली आहे. मात्र, हे अधिकारी अटेस्टेशन करून देण्यास नकार देत आहेत.
सध्या पीएच.डी.च्या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत आहे, तर अर्जाची प्रत विद्यापीठामध्ये जमा करण्यासाठी ६ नोव्हेंबर अंतिम मुदत आहे. मात्र, येऊ घातलेल्या दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर बहुतेक विद्यार्थ्यांनी गेले दोन दिवस अर्जाची प्रत जमा करण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र, अटेस्टेशनसाठी या विद्यार्थ्यांना जनसंपर्क कार्यालय, विद्यार्थी सुविधा केंद्र आणि बाकीचे विभाग असे खेटे घालावे लागत आहेत.