पुणे : शहराचा वाढता विस्तार, वाहनांची वाढणारी संख्या, निर्माणाधीन टोलेजंग इमारती यामुळे प्रदूषणात वाढ होत असताना महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतून २५ हजार वृक्ष तोडण्यास परवानगी देण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे कुणाल घारे यांनी केला. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (४ ऑगस्ट) ‘झाडांची अंतिम यात्रा’ हे प्रतीकात्मक आंदोलन केले जाणार आहे.

‘एका झाडाच्या बदल्यात साडेतीन झाडांची लागवड करणे अपेक्षित असताना एकही झाड लावले नाही,’ असाही आरोप घारे यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी ‘आप’चे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, अमोल काळे उपस्थित होते.

महापालिकेच्या परवानगीने ही झाडे तोडली जात असून, त्या बदल्यात झाडे लावली जातात की नाही, याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (४ ऑगस्ट) ‘झाडांची अंतिम यात्रा’ हे प्रतीकात्मक आंदोलन केले जाणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर ते महापालिका इमारत असा मोर्चा काढून हे आंदोलन होणार आहे, असे घारे यांनी सांगितले.

घारे म्हणाले, ‘पुणे शहरात विकासकामे सुरू आहेत. ही कामे होत असताना वृक्षतोड होईल, हे गृहीत धरले जाते. कायद्यानुसार वृक्षतोड केल्यानंतर त्या बदल्यात शहरात किंवा शहराबाहेर वृक्षारोपण करणे बंधनकारक आहे. तसेच, बांधकाम व्यावसायिकांना अनामत रक्कम भरून वृक्षतोड करण्यास परवानगी दिली जाते. परंतु बांधकाम व्यावसायिकांकडून वृक्षारोपण केले जात नाही. त्यांची अनामत रक्कम महापालिका जप्त करीत असली, तरी त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२३ दरम्यान १०,५०२ झाडे कापण्यास आणि ११,८६० झाडे स्थलांतरित करण्यास परवानगी देण्यात आली. यामध्ये एकूण ३.४ लाख झाडांची पुनर्लागवड अपेक्षित असून, त्यासाठी २२.५ कोटी रुपयांचा निधी विविध संस्थांकडून जमा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात झाडे कुठे लावली, याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. झाडांचे वयोमान लपवण्यासाठीही चुकीची माहिती देण्यात आली,’ असा आरोपही घारे यांनी केला.