पुणे : ‘साधेपणाने राहणाऱ्या माणसाला आपण बावळट समजतो. एक प्रकारचा शिक्का मारला गेल्याने आणि केवळ ‘श्यामची आई’ पुरतेच मर्यादित ठेवले गेल्याने साने गुरुजींना आपण नीटपणे समजू शकलो नाही. एवढेच नाही तर, त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यातही आपण अपयशी ठरलो,’ अशी खंत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी मंगळवारी व्यक्त केली. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘पालक, शिक्षक, कार्यकर्त्यांसाठी साने गुरुजी’ या विषयावर हेरंब कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

कुलकर्णी म्हणाले, ‘साने गुरुजी यांनी दीडशे पुस्तकांचे लेखन केले. तत्त्वज्ञानाचा इतिहास त्यांनी अनुवादित केला. ज्ञानेश्वरीनंतर सर्वाधिक वाचले गेलेले पुस्तक ‘श्यामची आई’ हे एकमेव पुस्तक आहे. साने गुरुजींच्या घडणीमध्ये आईच्या संस्कारांचा मोठा भाग आहे. सध्याच्या काळात पालक आणि मुले यांच्यातील संवाद हरवला आहे. पालकांचा अतिरेक आणि अतिआग्रह यामुळे मुले बिघडत आहेत. पुरुषत्वाच्या क्रूर लक्षणांचे विसर्जन केलेले संत ज्ञानेश्वर आणि साने गुरुजी हे पुरुष असूनही आपण त्यांना माउली म्हणतो.’

‘साने गुरुजींनी मुलांवर आईसारखे प्रेम आणि माया केली. अमळनेर येथे शिक्षक म्हणून काम करताना पगारातील निम्म्याहून अधिक रक्कम ते गरजू मुलांना आर्थिक मदत करण्यासाठी ठेवत असत. त्यांच्यातील शिक्षकाचे रूपांतर समाजशिक्षकामध्ये झाले होते. ‘आता उठवू सारे रान’ असे लिहिणारे साने गुरुजी रडवणारे लेखन करणारे नव्हते. तर, प्रसंगी ते आक्रमक होत असत. आताचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाशी एकरूप झाले आहेत का?’ असा सवाल कुलकर्णी यांनी उपस्थित केला.