केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी (२३ सप्टेंबर) मुंबई दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना विचारलं असता त्यांनी या गैरहजेरीमागचं कारण स्पष्ट केलं. ते रविवारी (२४ सप्टेंबर) पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “मी काल, २३ सप्टेंबरला बारामतीत होतो. मी जसा २४ सप्टेंबरला दिवसभर पिंपरी चिंचवडला वेळ दिली होती, २५ सप्टेंबरला दिवसभर पुण्याला वेळ दिली, तशीच २३ सप्टेंबरला बारामतीला वेळ दिली होती. मी वर्षानुवर्षे बारामतीचं नेतृत्व करतो आहे. बारामतीच्या पाच संस्था, सहयोग गृहनिर्माण संस्था, बारामती बँक, बारामती खरेदी संघ, बारामती दुध संघ, बारामती बाजार समिती या सगळ्या संस्थांची वार्षिक बैठक असते.”

“मी अमित शाहांच्या कार्यालयाला कळवलं होतं”

“ती बैठक मला चुकवायची नव्हती. या बैठकीची तारीख ठरवून १५ दिवस आधी अजेंडा काढला जातो. त्यामुळे मी अमित शाहांच्या कार्यालयाला हे कळवलं होतं की, अमित शाहांचा दौरा असला, तरी तिथे मी नाही. माझा आधीच दौरा ठरला आहे,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.

हेही वाचा : शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा फोटोने राजकीय चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गैरहजेरीबाबत शिंदे-फडणवीसांनाही सांगितलं होतं”

“मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याही कानावर ही गोष्ट घातली होती. मी बारामतीत होतो आणि संध्याकाळी बारामतीतील काही गणेश मंडळाच्या भेटी आणि इतर कार्यक्रम होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत माझं ते काम सुरू होतं,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.