पुणे : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वच राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचारात सहभागी होत एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत. पुण्यात महायुतीत मित्रपक्ष म्हणून सहभागी असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका महायुतीला अडचणीची ठरत आहे. ‘रिपाइं’च्या पदाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे.

भारतीय जनता पक्षाबरोबर मित्रपक्ष म्हणून महायुतीत समाविष्ट असतानाही ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या (रिपाइं) शहरातील पदाधिकाऱ्यांना सन्मान मिळत नसल्याने ‘रिपाइं’च्या गटातील पदाधिकाऱ्यांची नाराजी अद्यापही कायम आहे. भाजपकडून सन्मान मिळत नसल्याने विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मतदान न करण्याची शपथ या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नसल्याने महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे.

हेही वाचा – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…!

u

मित्रपक्ष असतानाही ‘रिपाइं’ला सन्मान मिळत नसल्याचा आरोप करून माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या निवडणुकीत महायुतीला मतदान न करण्याची शपथ या पदाधिकाऱ्यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ घेतली आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महायुतीकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अद्यापही ही नाराजी दूर झालेली नाही.

‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे (आठवले गट) प्रमुख खासदार रामदास आठवले यांनी यामध्ये पुढाकार घेऊन पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. आठवले यांनी फोनवरून समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतरही पदाधिकारी मतदान न करण्याच्या निर्धारावर ठाम असल्याने महायुतीसमोरील अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते आठवले हे केंद्रात मंत्री आहेत. भाजप नेत्यांकडे ते वारंवार रिपाइंला विधानसभा निवडणुकीत किमान १२ जागा द्याव्यात, असे म्हणत होते. पण भाजपने किंवा महायुतीमधील अन्य पक्षांनाही या मागणीकडे लक्ष दिले नाही. जागावाटपात आठवले यांना सामावून घेतले नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मतदान न करण्याची शपथ घेतल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.

हेही वाचा – पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपला आंबेडकरी विचारांची मते चालतात. मात्र, त्यांना सत्तेत वाटा द्यायचा नाही, हे धोरण योग्य नाही. त्यामुळे महायुतीला मतदान करायचे नाही, हा निर्णय घेतला आहे. त्याला आंबेडकरी चळवळीतील अनेकांचा पाठिंबा मिळाला. – डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर