‘लोकसत्ता’च्या मदतीमुळेच माझे करिअर घडले : अभियांत्रिकी तरुणीची कृतज्ञता

प्रतिकूल परिस्थितीत उत्तम गुण मिळवून उच्च शिक्षण घेण्याची जिद्द तिने पुरी केली खरी, पण शिक्षणानंतरही कष्ट काही संपलेच नाहीत. दोन ठिकाणी नोकरी केल्यानंतर आता नुकतीच तिला एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये चांगली नोकरी लागली आहे. या प्रवासामध्ये ‘लोकसत्ता’ने दिलेल्या योगदानामुळे अंकिताचे करिअर आता एका वेगळ्या टप्प्यावर आले आहे. अंकिताने ‘लोकसत्ता’ कार्यालयात येऊन आपल्या वाटचालीमध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या ‘लोकसत्ता’विषयी कृतज्ञता व्यक्त केली.

‘आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे’ ही काव्यपंक्ती जगताना आता अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये योगदान देत अत्युच्च ठिकाणी पोहोचण्याचा ध्यास अंकिताने घेतला आहे. अव्वल गुणवत्तेचे संचित गाठीशी असताना कोणाचाही आधार नसल्याने अंकिता दत्तात्रय जगताप ही विद्यार्थिनी उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता होती. दुष्काळी खटाव (जि. सातारा) तालुक्यातील वर्धनगर गावातील रयत शिक्षण संस्थेच्या वर्धिनी विद्यालयाची अंकिता मूळची घारपुडे या गावाची. मात्र, वडिलांचे आजारपण आणि गावात कुणाचाच आधार नसल्याने आई सुरेखा आणि धाकटी बहीण अक्षता हिच्यासमवेत ती मामाकडे राहिली. शेतामध्ये मोलमजुरी करून चरितार्थ चालविणाऱ्या आईला अंकिताने शाळेचा अभ्यास सांभाळून मदत केली. ऐपत नसल्यामुळे कोणताही क्लास न लावता अंकिताने दहावीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण संपादन केले. परिस्थितीने घातलेल्या कोडय़ावर मात करताना तिने गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिची वाट आणखी बिकट झाली होती. मात्र, ‘लोकसत्ता’ने आवाहन करताच अंकिताच्या शिक्षणासाठी समाजाकडून पैसा उभा राहिला. सामान्य नागरिकांनी विश्वास दाखवून केलेल्या मदतीमुळे अंकिताच्या उच्च शिक्षणाची दारे उघडली गेली.

माझ्या जडणघडणीमध्ये ‘लोकसत्ता’चे विशेष योगदान आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करीत अंकिताने शिक्षणाची बिकट वाट उलगडली. ‘लोकसत्ता’ने केलेल्या आवाहनातून आणि लोकांनी केलेल्या मदतीतून दीड लाख रुपयांची मदत मिळाली. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयाने काही प्रमाणात शुल्क माफ केले. गावापासून दररोज दीड तासाचा प्रवास करणे शक्य नसल्याने वसतिगृहामध्येच राहण्याचे ठरविले. या आर्थिक सहकार्यातून शिक्षणाचा खर्च भागला, असे सांगून अंकिता म्हणाली, पदवी संपादन करायची आणि पुण्यामध्ये प्रवेश घ्यायचा कसा हा प्रश्न होता. गावाकडे वडिलांच्या नावावर असलेल्या शेतीवर शैक्षणिक कर्ज घेतले. आई-वडील आणि बहिणीला घेऊन पुण्याला आले. ‘कमवा आणि शिका’ ही कर्मवीरांची शिकवण आचरणात आणून नोकरी करीत शिक्षण पूर्ण केले. आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाची (ईबीसी) सवलत मिळावी यासाठी बालेवाडी येथील गेनबा मोझे महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला.

प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होत पदवी संपादन केल्यानंतर नोकरी मिळत नव्हती. एका कंपनीमध्ये संधी मिळाली. माझे काम पाहून एक महिन्यातच मला संशोधन आणि विकास (आरअँडडी) विभागामध्ये घेतले. पण, दीड वर्षे पगारवाढ झाली नाही. या वर्षांच्या सुरुवातीला दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली तेव्हा पगारामध्ये ५० टक्के वाढ झाली. मात्र, डिसेंबरअखेरीस कंत्राट संपणार असल्यामुळे नवीन नोकरी करणे भाग होते. एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी मिळाली आणि पगारामध्येही दुप्पट वाढ झाली. शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना असून आता, माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांला असलेल्या बहिणीचे शिक्षण पूर्ण करणे हे माझे स्वप्न असल्याचे अंकिताने सांगितले.