पुणे : युवा पिढीला राष्ट्रीय मूल्यांचा सन्मान राखण्याच्या दृष्टीने प्रेरित करण्यासाठी देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सशस्त्र दलांकडून देशभरातील १४२ ठिकाणी बँडवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यात राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर येथे बँडवादन केले जाणार आहे.
संरक्षण विभागाने ही प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. बँडवादन कार्यक्रमांत लष्कर, नौदल, हवाई दल यांच्यासह भारतीय किनारपट्टी सुरक्षा दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राष्ट्रीय छात्र सेना यांचा सहभाग असणार आहे. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी बँडवादन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी, देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा उत्सव साजरा करण्याचा उद्देश आहे.
बँडवादन उपक्रमांतर्गत राज्यात तीन ठिकाणी बँडवादन कार्यक्रम होणार आहे. त्यात मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, फ्लोरा फाउंटन, छत्रपती शिवाजी टर्मिनस, बँड स्टँड येथे, नागपूर येथील दीक्षा भूमी, तर पुण्यातील शनिवार वाडा, गांधी राष्ट्रीय संग्रहालय येथे बँडवादन कार्यक्रम होणार आहे. सशस्त्र दलांकडून होणारे बँडवादन हे केवळ सांगीतिक अभिवादन नसून, देशाचा गौरवशाली इतिहास, उज्ज्वल भविष्यातील वाटचालीची जाणीव करून देणारे आहे, अशी माहिती देण्यात आली.
देशभरात बँडवादन कार्यक्रम
बँडवादनाच्या उपक्रमांतर्गत देशभरातील २८ राज्ये, ८ केंद्रशासित प्रदेश आणि ९६ शहरांमध्ये एकूण १४२ ठिकाणी बँड वादन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात २० ठिकाणी लष्कर, ९ ठिकाणी नौदल, ७ ठिकाणी वायुदल, एका ठिकाणी भारतीय किनारपट्टी दल, १८ ठिकाणी राष्ट्रीय छात्र सेना, १७ ठिकाणी सीआरपीएफ, ९ ठिकाणी आयटीबीपी, ४ ठिकाणी सीआयएसएफ, ११ ठिकाणी एसएसबी, एका ठिकाणी आयडीएस, १९ ठिकाणी आरपीएफ, तर १३ ठिकाणी आसाम रायफल्स यांच्यातर्फे बँडवादन केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.