उद्धव ठाकरे कधी मुख्यमंत्री होतील, असे वाटले नव्हते. कारण त्यांना मुख्यमंत्रीपदाची कधीही महत्वकांक्षा नव्हती. त्यांना प्रशासकीय बाबींची काहीही माहिती नाही. ते एक अनुभव शून्य व्यक्ती आहेत, त्यामुळे राज्य अधोगतीकडे जाईल, अशा शब्दांत भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
राजकीय, समाजिक, अधिकारी वर्ग एकत्रित येण्याच्या दृष्टीने पुण्यात सॅटरडे क्लबचे अनेक वर्षांपासून आयोजन केले जाते. यंदादेखील याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, माजी महापौर अंकुश काकडे, निवेदक सुधीर गाडगीळ तसेच विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.
यावेळी निवेदक सुधीर गाडगीळ यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी नारायण राणे यांनी नाईट लाईफ बद्दल आपली भुमिका मांडली. ते म्हणाले की, मुंबईकरांनी कधीही नाईट लाईफ मागणी केली नव्हती. मात्र, मुख्यंमत्र्यांकडून चिरंजीवांच्या हट्टापायी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा हट्ट पुरवण्याऐवजी त्यांनी राज्यातील इतर प्रश्न सोडवावेत, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिला.
राणे पुढे म्हणाले, मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो, माझे गुरु बाळासाहेब ठाकरे असून त्यांच्या तालमीत मी तयार झालो आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगताना ते म्हणाले, बाळासाहेब मला म्हणाले होते की नारायण कायम मनाची श्रीमंती ठेवावी. कारण एका म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही. त्यामुळे माणसानं नेहमी पैसा हवा की, नावलौकिक हे ठरवाव.