इंदापूर : पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या इंदापूरमधील डिकसळ येथील ब्रिटिशकालीन पुलाला भीमा नदीच्या वाढत्या पाण्यामुळे भगदाड पडले आहे. हा पूल धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर सीमेवरील २० पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

सध्या उजनी धरणाच्या पाण्याची पातळी वाढत असून, पाण्याच्या लाटा पुलाच्या भिंतींवर आदळत आहेत. त्यामुळे पुलाच्या भराव्याच्या संरचना निखळून पडत असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले. पुलाला भगदाड पडल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

५० किलोमीटरचा वळसा

डिकसळ येथे भीमा नदीवर ब्रिटिशांनी १८५५ साली हा पूल रेल्वे मार्गासाठी बांधला. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हा पूल येत असल्याने रेल्वे वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली. नवीन रेल्वे मार्ग झाल्यानंतर हा पूल रस्ते वाहलातुकीसाठी खुला करण्यात आला. गेली अनेक दशके हा पूल दोन्ही जिल्ह्यांच्या नागरिकांकडून वापरण्यात येतो. आता हा पूल बंद करण्यात आल्याने २० पेक्षा अधिक गावांतील नागरिकांना सुमारे ५० किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करावी लागणार आहे.

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील केतूर, जिंती, कोंढार चिंचोली, खातगाव, पारेवाडी, पोमलवाडी, कात्रज, रामवाडी आदी गावांमधील नागरिक हे शैक्षणिक, आरोग्य आणि शेतीसंबंधी कामांसाठी दररोज भिगवणला येत असतात. आता या गावांचा संपर्क तुटला आहे. या पुलाचा वापर करून करमाळा तालुक्यातील ऊस बारामती अॅग्रो, अंबालिका, दौंड शुगर, इंदापूर साखर कारखान्याला देण्यात येतो. यापूर्वी पुलावरील जड वाहतुकीमुळे धोका निर्माण झाल्याने काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती. नंतर राजकीय हस्तक्षेपानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली. आता पुलाला भगदाड पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पुनर्बांधणीच्या कामात अडथळा

करमाळा विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार संजय शिंदे यांनी पुलाच्या पुनर्बांधणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. मात्र, निधी अपुरा पडल्यामुळे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रखडले. २०२४ मध्ये कामास सुरुवात झाली असली तरी, उजनी धरणाच्या वाढत्या पाण्यामुळे काम वारंवार थांबवावे लागत आहे. सध्या पाण्याच्या पातळीत पुन्हा वाढ झाल्याने काम ठप्प झाले आहे.

पूल बंद करण्यात आल्याने लोकांची गैरसोय होत आहे. नवीन पुलाचे काम प्रलंबित आहे. जुन्या पुलाची तत्काळ डागडुजी करून तो काही काळ सुरक्षितपणे वापरता येईल, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. – तुषार हगारे, स्थानिक रहिवासी, डिकसळ.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुलाचे बांधकाम ब्रिटिशकालीन आहे. भराव्याचा भाग खचल्याने पुलाला धोका होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. – शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा.