पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर श्वान असल्याने विमानाला एक तास विलंब झाल्याची घटना शनिवारी घडल्यानंतर विमानतळ प्रशासन आणि हवाई दलाने महापालिकेच्या श्वान पथकाला पाचारण करून श्वानांची धरपकड मोहीम राबवली. सोमवारी दिवसभर चाललेल्या या मोहिमेत पाच श्वान पकडण्यात आले. विमानतळ परिसरात शंभराहून अधिक मोकाट श्वान असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुणे विमानतळाच्या लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने केरकचरा, अस्वच्छता असते. त्यामुळे पक्षांसोबत मोकाट जनावरांचा वावर असतो. विमानतळ परिसरात पक्ष्यांचे थवे असल्याने विमानांच्या उड्डाणांमध्ये अडथळे येत आहेत. धावपट्टी आणि लगतचा परिसर यातील अंतर फारसे नसल्याने तारेचे कुंपण आणि तडे गेलेल्या भिंती ओलांडून श्वानांचा मुक्त संचार सुरू असल्याने विमानांना अडथळे निर्माण होत आहेत. काही दिवसांपूर्वी परिसरात बिबट्याही आढळून आला होता. याचा फटका विमान सेवेबरोबर प्रवाशांना बसत आहे.

विमानतळावरून हवाई उड्डाणांना पक्ष्यांचा धोका कमी व्हावा, तसेच श्वानांचा मुक्त संचार कमी करण्यासाठी हवाई दलाने पाच सदस्यांचे स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. तसेच ‘हाय डेसिबल झोन गन’ने पक्ष्यांना परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात येतो.

याबाबत हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर म्हणाले, ‘अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील विमानांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कार्यवाही करणे अपेक्षित आहे. भविष्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात येणार असताना झपाट्याने होणारे नागरीकरण आणि आजूबाजूच्या लोकवस्तीचा विचार करून विस्तारीकरण करावे लागणार आहे. विमानतळ परिसरात मोकाट जनावरे, पक्ष्यांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’

महानगरपालिकेचे श्वान पथक हे धावपट्टीजवळील श्वानांच्या नोंदींवर लक्ष ठेवते. आम्ही त्यांना स्थलांतरित करू शकत नाही. मोकाट श्वानांना परिसरातून हटविण्यासाठी विमानतळ प्रशासन आग्रही असले, तरी श्वानप्रेमी विरोध करत असल्याने अडचणी येत आहेत.-शैलेंद्र चव्हाण,अधिकारी, श्वान पथक, पुणे महापालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निर्देशानुसार विमानतळ परिसर हा प्राणी आणि पक्षीविरहीत असणे बंधनकारक आहे. प्राणी किंवा पक्षी असल्यास दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ