लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेतल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा मतदारसंघातील नागरी समस्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. वाहतूककोंडी, जलवाहिनी आणि सांडपाणी वाहिन्यांच्या समस्या, नाल्यावरील सीमाभितींची कामे तातडीने करण्याची सूचना पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली. तसेच दर महिन्याला प्रत्येक भागातील नागरी समस्यांचा आढावा घेणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले.

एरंडवणा-हॅप्पी कॉलनी या प्रभाग क्रमांक १३ मधील नागरी समस्यांबाबत नागरिकांनी पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, परिमंडळ दोनचे उपायुक्त संतोष वारूळे, परिमंडळ तीनच्या उपायुक्त आशा राऊत, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय अधिकारी राजेश गुर्रम, मल:निस्सारण अधीक्षक अभियंता श्रीधर येवलेकर, भाजप शहर सरचिटणीस पुनीत जोशी, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे आणि मंजुश्री खर्डेकर या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-पुणे जिल्ह्यातील मतदार संख्या ८० लाख ७३ हजार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रभागातील वाहतूककोंडी, अंतर्गत जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्यांच्या समस्या, कचरा डेपो, स्वप्नशिल्प आणि तारा रेसिडन्सी भागातील अतिक्रमण, नाल्यांवरील सीमा भिंती आणि अनधिकृत खाटिकखान्यांबाबतच्या समस्या नागरिकांनी मांडल्या. या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अशी सूचना पाटील यांनी केली. स्वप्नशिल्प आणि तारा रेसिडेन्सी भागातील अतिक्रमणे हटविण्यात यावीत, नाल्यालगतच्या सीमा भिंती महापालिकेने बांधाव्यात, महापालिकेला ते शक्य नसल्यास लोकसहभागातून सीमाभिंतीची कामे पूर्ण करावीत, सोसायट्यातील अंतर्गत जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्या मुख्य वाहिन्यांना जोडण्यात याव्यात, तसेच भुजबळ बाग येथील अनधिकृत कचरा डेपो हटविण्यात यावा, असे पाटील यांनी सांगितले.