पुणे : नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार असून, या उपक्रमाचे विभागनिहाय नियोजन करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
शालेय शिक्षण विभागाने ‘१०० शाळांना भेटी’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार यांनी त्यांच्या मतदारसंघातील जवळच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची योजना आखली आहे. तसेच शासनातील अधिकारीही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागतासह शाळेतील कामकाज, शैक्षणिक दर्जा, शाळा इमारत, विद्यार्थ्यांसाठी खेळाच्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, शालेय पोषण आहार आणि इतर सोयीसुविधांबाबतही या उपक्रमाद्वारे आढावा घेण्याचाही उद्देश आहे.
या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना शिक्षणमंत्री भुसे म्हणाले, ‘शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्य मंत्री, अधिकारी शाळांमध्ये उपस्थित राहणार आहेत. या बाबत अतिशय बारकाईने विभागनिहाय नियोजनही करण्यात आले आहे. या उपक्रमातून विद्यार्थी, पालकांना प्रोत्साहन मिळेल. तसेच शाळांमध्येही चांगले वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम येत्या काळात नक्कीच दिसून येतील.