पिंपरी: गणेश विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिवर्धकांच्या (डीजे) आवाजामुळे काहींचे कान बहिरे झाले तर काहींना हृदयविकाराचा धक्का बसला. लेझर बीममुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा होते. याबाबतचे धोके वैद्यकीय क्षेत्रातील लोक सांगतात. त्यामुळे ध्वनिवर्धक विरहित मिरवणुका काढाव्यात. नाईलाजास्तव याबाबत कठोर कायदा करायला भाग पाडू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेश मंडळांना दिला.
अजित पवार गटातर्फे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव आणि गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते झाले. आकुर्डीत शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमाला शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे उपस्थित होते.
पवार म्हणाले की, वाढत्या प्रदूषणाला सर्वजण जबाबदार आहेत. जबाबदारीचे भान कोणाच्या लक्षात येत नाही. प्रदूषणामुळे वेगवेगळे आजार, साथी येत आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्लोबल वार्मिंगचे संकट दारावर आले आहे. राज्याच्या अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. ब-याच ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गरजेपुरते पाणी वापरावे. पाण्याची बचत करावी, अपव्यय टाळावा.
हेही वाचा… अजित पवारांची भाजपवर टीका, म्हणाले, पिंपरी- चिंचवडची विकासाची घडी बिघडली…’
देशात नरेंद्र मोदी यांच्याशिवाय मजबूत नेतृत्व आपल्यापुढे नाही. त्यांच्याकडे विकासाची दिशा आहे. देशाला जगामध्ये एका महत्वाच्या स्थानावर पोहोचविले आहे. जगातील अनेक देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. महायुती सरकारमध्ये काम करताना सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका आहे. विचारांशी प्रतारणा, ध्येय-धोरणांशी तडजोड होणार नाही, हे कटाक्षाने पाहता असतो.