scorecardresearch

‘बालगंधर्व’च्या पुनर्विकासाविषयी काहीही माहिती नाही – अजित पवार

याविषयी बहुमताचा आदर करून पुढे गेले पाहिजे, असे सूचक मतही त्यांनी व्यक्त केले.

पिंपरी : पुण्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्यात येत असून त्याची प्रकिया पुणे महापालिकेने सुरू केली आहे. असे असतानाही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मात्र, या पुनर्विकासाविषयी मला काहीच माहिती नाही, असा दावा शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला. याविषयी बहुमताचा आदर करून पुढे गेले पाहिजे, असे सूचक मतही त्यांनी व्यक्त केले.

चाकण येथे एका खासगी कार्यक्रमासाठी पवार आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाविषयी महापालिकेने मागच्या काळात घेतलेला निर्णय आहे. याविषयी वृत्तपत्रांमध्ये परस्परविरोधी बातम्या येत आहेत. मात्र, मला याविषयी काही माहिती नाही. त्यांनी माझ्या उपस्थितीत सादरीकरण केले, ते मी पाहिले आहे. या पुनर्विकासाचा निर्णय कसा घेतला, असा प्रश्न तेव्हा मी संबंधितांना विचारला असता, महत्त्वाच्या कलाकारांसह सर्वसमावेशक समितीची स्थापना केली असून नियोजनानुसार तीन सभागृह, एक अ‍ॅम्फी थिएटर, वाहनतळ अशा वेगवेगळय़ा गोष्टी त्यात आहेत, असे त्यांनी मला सांगितले. कोणताही नवीन निर्णय घ्यायचा असल्यास त्याला दोन बाजू असतात. मात्र, बहुमताचा आदर करून पुढे गेले पाहिजे, या मताचे आम्ही राज्यकर्ते आहोत.

औरंगजेब या विषयावरून सुरू झालेल्या वादासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर प्रसारमाध्यमांनी अशा गोष्टींना फार महत्त्व देऊ नये. एकाने काही तरी वक्तव्य करायचे, दुसऱ्याने त्याला प्रत्युत्तर द्यायचे, यामुळे नको त्या गोष्टी सुरू होतात. हे ताबडतोब थांबले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवूनच आपण वागले पाहिजे, असे पवार म्हणाले.

वस्तुस्थितीला धरून बातम्या द्या

उत्तर प्रदेश व महाराष्ट्र असा वाद निर्माण होऊ लागला आहे, या विषयी पत्रकारांनी विचारणा केली असता, असा काहीही वाद नाही. प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थितीला धरून बातम्या दिल्यास काही होणार नाही. सगळे शांत राहील, कुठेही पेटापेटी होणार नाही, असे अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Don t know about the redevelopment of bal gandharva rang mandir ajit pawar zws

ताज्या बातम्या