पुणे : राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे गेल्या २४ तासांपासून आंदोलन सुरू आहे. आश्वासन नको अंमलबजावणी हवी, अशी भूमिका घेत विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“राज्य सरकार राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थी वर्गासोबत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र दिले असून, लवकरच आयोग नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होईल. त्यामुळे कालपासून सुरू असलेले आंदोलन मागे घ्यावे. हे सरकार स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले.

हेही वाचा – पुणे : अपेक्षांच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांमध्ये ‘एक्झाम अँक्झायटी’, दडपण कमी करण्यासाठी राज्यातील मानसोपचार तज्ज्ञांचा पुढाकार

हेही वाचा – पुणे : हांडेवाडीतील भाजी मंडईला आग; ९० स्टाॅल भस्मसात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंदोलनाच्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तरीदेखील जोवर आयोग मागणी मान्य करत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या ठिकाणावरून हटणार नसल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार, काँग्रेसचे पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थी वर्गाला आंदोलन मागे घेण्याची विनंती करूनदेखील विद्यार्थी ठिय्या आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.