पुणे : जर्मनीतील हिटलरची ‘एक लोक, एक देश, एक नेता’ या नीतीनुसार भारतात ‘एक देश-एक भाषा’ हे असे धोरण आखले जात आहे,’ अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारचे नाव घेता टीका करून हिंदी भाषेची सक्ती आपल्यावर लादत असल्याचे नमूद केले.

ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले लिखित ‘असा डांगोरा शब्दांचा’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, लेखक अविनाश गोडबोले यावेळी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘सन १९३० मध्ये ‘एक लोक, एक देश आणि एक नेता’ असा नामोल्लेख असलेले फलक हिटलरच्या पक्षाचे होते. हीच नीती आपल्याकडे केंद्राकडून अवलंबिण्यात येत आहे. त्यातूनच ‘एक देश-एक भाषा’ या सूत्रानुसार हिंदी सक्ती लादण्यात येत आहे. केंद्राच्या विरोधात कोणी बोलत नाही, लिहीत नाही. सर्वत्र गळचेपी सुरू आहे. प्रसारमाध्यमांचा एकच स्तंभ या विरोधात आवाज उठवू शकतो. विद्यमान राजकीय व्यवस्थेबद्दल युवा पिढीचे दुर्लक्ष चिंताजनक असून, मला भारताच्या लोकशाहीबद्दल चिंता वाटू लागली आहे.’

‘आमचा हिंदी भाषेला विरोध नसून, ‘सक्ती’ला आणि पहिलीच्या वर्गापासून हिंदी शिकविण्याला आहे. या विरोधात राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी हिंदीविरोधी भूमिका घ्यायला हवी. त्रिभाषा सूत्रात कोणती भाषा घ्यायची, याचे स्वातंत्र्य राज्यांना आहे. हिंदी अनिवार्य हे भाषिक नसून, राजकीय आक्रमण आहे. कोवळ्या वयात तीन भाषा लहान मुलांवर लादणे हा अन्याय आहे,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार बागाईतकर यांनी व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखणीतून डांगोरा पिटावा

‘केसरीचा दबदबा असणाऱ्या काळात वा. रा. कोठारी यांनी पुण्यात ब्राह्मणेतर चळवळीचे पहिले ‘जागरूक’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते. कोठारी यांचा वारसा गोडबोले चालवित आहेत. संत तुकाराम महाराजांनी ‘पिटू भक्तीचा डांगोरा कळिकाळासी दरारा’, असे म्हटले होते. आता पत्रकारांनी चांगल्या गोष्टींसाठी आपल्या लेखणीतून डांगोरा पिटायला हवा’, असे आवाहन डाॅ. मोरे यांनी केले.