पुणे : प्रशांत महासागरात सक्रिय असलेली एल-निनोची स्थिती फेब्रुवारी महिन्यांतही सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. मात्र, फेब्रुवारीनंतर एल-निनोची स्थिती हळूहळू कमजोर पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात एल-निनोची स्थिती कायम आहे. तेथील समुद्रातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीनंतर एल-निनो स्थिती हळूहळू कमजोर पडण्याचा अंदाज आहे. तसे झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. तसेच हिंदी महासागरातील द्वि-धुव्रिताही सध्या सक्रिय आहे. पुढील एक दोन महिन्यांत ही स्थिती तटस्थ अवस्थेत पोहचण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>पुणे : सराफ दुकानात गोळीबार, चोरीचा प्रयत्न करणारा जेरबंद

फेब्रुवारी महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारी महिन्यात देशभरात सरासरी २२.७ मिमी पाऊस पडतो, सरासरीच्या तुलनेत ११९ टक्के पावसाचा अंदाज आहे. राज्यात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मागील वर्षभर किमान तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहिले होते. जानेवारी महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा एक ते तीन अंश सेल्सिअसने जास्तच राहिले आहे. फेब्रुवारी महिन्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान देशभरात जास्त राहण्याचा अंदाज आहे. मात्र, राज्यात मुंबई, किनारपट्टी वगळता कमाल तापमान सरासरी इतकेच राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता कमीच आहे.

हेही वाचा >>>द्रुतगती मार्गावर अपघातात टेम्पोचालकासह दोघांचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या महिन्यात ७.२ मिमी पाऊस

जानेवारी महिन्यांत देशभरात सरासरी ७.२ मिमी पाऊस पडला आहे. १९०१ ते २०२४ या काळातील नवव्या क्रमांकाचा सर्वांत कमी पाऊस झाला आहे. जानेवारी महिन्यांत देशात सरासरी १७.१ मिमी पाऊस पडतो. विभागनिहाय विचार करता उत्तर भारतात सरासरी ३३.८ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात फक्त ३.१ मिमी पाऊस पडला. ईशान्य भारतात सरासरी १७.२ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ५.६ मिमी पाऊस झाला. मध्य भारतात सरासरी ७.४ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ५.३ मिमी पाऊस झाला. दक्षिण भारतात सरासरी ७.८ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात १८.२ मिमी म्हणजे सरासरीच्या १३३ टक्के पाऊस पडला.