पुणे : रास्ता पेठेत मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून तीन लाख ७३ हजार रुपयांचे १८ ग्रॅम मेफेड्रान जप्त करण्यात आले.
आकिब अश्फाक शेख (वय २८, रा. एसआरए वसाहत, पत्र्याची चाळ, एडी कॅम्प चौक, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रास्ता पेठेतील के. ई. एम रुग्णालयासमोर शेख थांबला होता. तो मेफेड्रोन विक्रीसाठी आल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडून मेफेड्रोन सापडले. जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोनची किंमत तीन लाख ७३ हजार रुपये आहे. त्याने मेफेड्राेन कोठून आणले, तसेच तो कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ,सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नधत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस कर्मचारी विशाल दळवी, दयानंद तेलंगे, सर्जेराव सरगर, सुहास डोंगरे, विपुल गायकवाड, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, रेहाना शेख, स्वप्नील मिसाळ यांनी ही कामगिरी केली.