पुणे : मोसमी पावसाने गुरुवारी रात्रभर पश्चिम घाटमाथ्यावर धुमाकूळ घातला. ताम्हिणीमध्ये ५५६ मिलिमीटर, भिरामध्ये ४०१ आणि लोणावळ्यात ३२९ मिमी पाऊस पडला. घाटमाथ्यावर अन्य ठिकाणीही सरासरी २५० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, मंगळवार, बुधवारपासून पावसाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंत घाटाच्या परिसरात अतिमुसळधार पाऊस पडला. लोणावळा (टाटा) ३११, लोणावळा ३२९, शिरगाव ४८४, आंबोणे ४४०, डुंगरवाडी ४०७, कोयना (पोफळी) १३२, कोयना (नवजा) १५७, खोपोली २२५, ताम्हिणी ५५६ आणि भिरा ४०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

किनारपट्टी परिसरातही मध्यम ते मुसळधार पाऊस पडला, तर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अलिबाग येथे २९ मिलिमीटर, हर्णे येथे ५५, कुलाबा ४५, सांताक्रुज ७७, रत्नागिरी येथे ३४ मिमी पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे १४३ मिलिमीटर, कोल्हापूर येथे १७, सातारा येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

हेही वाचा : पुणे: शहरात दोघांचा बुडून मृत्यू; आंबील ओढा, नारायण पेठेतील दुर्घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घाटमाथ्यावर आजही अतिमुसळधारेचा अंदाज

हवामान विभागाने शुक्रवारी (२६ जुलै) किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. रत्नागिरी, रायगड आणि साताऱ्याला लाल इशारा दिला आहे. जिल्ह्याच्या घाट परिसरात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना नारंगी इशारा देण्यात आला आहे. नाशिक, धुळे, नंदूरबार आणि पूर्व विदर्भाला पिवळा इशारा देण्यात आला आहे.