पुणे : जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि नगराध्यक्ष या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी (मविआ) एकत्रितपणे लढणार आहे. ‘मविआ’तील तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत (मनसे) कोणताही प्रस्ताव किंवा सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
दरम्यान, महायुतीशी संलग्न पक्षासोबत कोणतीही युती केल्यास किंवा प्रयत्न झाल्यास पक्षविरोधी भूमिका घेतल्यास पक्षस्तरावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ‘मविआ’च्या तिन्ही जिल्हाध्यक्षांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे जिल्हाध्यक्ष उल्हास शेवाळे यावेळी यावेळी त्यांनी ‘मविआ’ची भूमिका जाहीर केली. काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर येथील उपाध्यक्ष गोविंद मिरगे, खडकवासला उपाध्यक्ष संजय अभंग उपस्थित होते.
‘नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकांसाठी ‘मविआ’च्या वतीने एकत्रित रणनीती आखली जात आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्रच लढणार आहोत. मनसेबरोबरचा विषय अद्याप चर्चेला आलेला नाही. स्थानिक पातळीवर आम्ही समन्वयाने संघटना मजबूत करून महायुतीच्या विरोधात लढणार असून, आम्ही नक्कीच चांगले यश मिळवू,’ असा विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोलते यांनीही शेवाळे यांच्या गोष्टीला दुजोरा दिला. ‘जिल्ह्यात काही स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढण्याबाबत खोट्या चर्चा पसरविल्या जात आहेत. पक्षाच्या वरिष्ठांकडून अशा कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत.
पक्षाच्या आदेशानुसारच निवडणुकांना सामोरे जाणार आहोत,’ असे कोलते यांनी नमूद केले, तर ‘तिन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांकडून मनसेबरोबरच्या युतीबाबत कोणतीही सूचना दिलेली नाही. आम्ही ‘मविआ’च्या घटक पक्षांबरोबरच पुढे जाणार आहोत. स्थानिक पातळीवरील पक्षबळानुसार, ताकदीच्या उमेदवारानुसार सहमतीने जागा वाटप करण्यात येईल,’ असे चव्हाण-पाटील यांनी सांगितले.
आयोगाविरोधात तक्रारी कायम
निवडणूक आयोगाविरोधात तक्रारी कायम आहेत. जिल्हा पातळीवर प्रभाग पद्धतीबाबत सूचना आणि हरकती घाई-गडबडीत पार पाडण्यात आल्याचा आरोप या वेळी ‘मविआ’च्या जिल्हाध्यक्षांनी केला. निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या असताना कुठलेच उत्तर मिळाले नसल्याचेही सांगण्यात आले.
