मागणीत वाढ झाल्याने बटाटा, भेंडी, गवार, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, वांगी, घेवडा, मटार, पावटा या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२५ सप्टेंबर) राज्य; तसेच परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ७ ते ८ ट्रक हिरवी मिरची, गुजरातमधून ३ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ३ टेम्पो घेवडा, इंदूरहून ५ ते ६ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १३ ते १४ ट्रक लसूण, गुजरातमधून ५ ते ६ टेम्पो भुईमूग शेंग, आग्रा, इंदूरमधून मिळून ४५ ते ५० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा- PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,भाजपसह इतर हिंदुत्ववादी संघटनांची पुणे पोलिस आयुक्तांकडे मागणी

पुणे विभागातून सातारी आले १५०० ते १६०० गोणी, कोबी ८ ते १० टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, मटार ४० गोणी, कांदा ५० ट्रक तसेच पुणे विभागातून नवीन बटाट्याच्या ५०० ते ६०० गोणी अशी आवक बाजारात झाली.

पालेभाज्या तेजीत

पावसामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला असून पालेभाज्या खराब हाेण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर ३५ ते ४० रुपये आहेत. मेथीच्या एका जुडीचे दर ३० रुपये आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात काेथिंबिरीच्या दीड लाख जुडी; तसेच मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली.

हेही वाचा- पुणे : बारामती आम्हीही जिंकू शकतो , रामदास आठवले यांचा विश्वास

चिकू, अननस, पेरु, डाळिंबाच्या दरात वाढ

आवक कमी झाल्याने चिकू, अननस, पेरु, डाळिंबाच्या दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. लिंबे, पपई आणि कलिंगडाच्या दरात घट झाली आहे. खरबूज, सीताफळ, संत्री, मोसंबीचे दर स्थिर आहेत. फळबाजारात लिंबू एक हजार ते दीड हजार गोणी, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई ५ ते ६ टेम्पो, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज १ ते २ टेम्पो, संत्री २० ते २५ टन, मोसंबी ७० ते ८० टन, सीताफळ २० ते २५ टन, चिकू ५०० खोकी अशी आवक फळबाजारात झाली. चिकूच्या दरात खोक्यामागे २५० रुपयांनी वाढ झाली आहे. पेरू २० किलामागे १०० रुपये, तीन डझन अननसाचे दर ३० रुपयांनी वाढले आहेत.

नवरात्रोत्सवामुळे फुलांना मागणी

नवरात्रोत्सवामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातून फुलांची आवक वाढली आहे. पावसामुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला असल्याची माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

हेही वाचा- पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांना धमकीचा संदेश पाठवून खंडणीची मागणी


मटण, मासळी, चिकनच्या मागणीत घट

नवरात्रोत्सवाचा प्रारंभ सोमवारी (२६ सप्टेंबर) होणार आहे. नवरात्रोत्सवात अनेकजण उपवास करत असल्याने मटण, मासळी, चिकनला रविवारी फारशी मागणी राहिली नाही. गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्र, खाडीतील तसेच नदीतील मासळीची आवक झाली. आंध्र प्रदेशातील रहू, कतला, सीलन मासळीची आवक झाली, असे गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. मटण, मासळीच्या मागणीत घट झाल्याचे सांगण्यात आले.