मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी सुरुवातीला किरण गोसावीचा उल्लेख केला होता. याशिवाय आर्यन खानसोबत सेल्फी काढल्यामुळेही तो चर्चेत होता. क्रूझवरील संपूर्ण कारवाईदरम्यान समीर वानखेडेंसोबत असणारा साक्षीदार किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली आहे. त्याबाबत पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली आहे.

“२०१८ मध्ये पुणे येथे फसवणुकीच्या प्रकरणात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी किरण गोसावी तेव्हापासून फरार होता. त्यांतर आज सकाळी किरण गोसावीला अटक करण्यात आली आहे. किरण गोसावीविरोधात आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून त्याला अटक करण्यात आली आहे. कात्रज येथील एका लॉजमधून किरण गोसावीला अटक करण्यात आली आहे. त्याने आत्मसमर्पण केलेले नाही त्याला पुणे पोलिसांनी सकाळी तीन वाजता अटक केली आहे,” अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

“एका व्यक्तीला नोकरी देण्याच्या बहाण्याने मलेशिया येथे पाठवण्यात आले होते. त्यामध्ये त्या व्यक्तीची फसवणूक करण्यात आली त्याआधारावर २०१९ मध्ये यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला होता. किरण गोसावीला फरार घोषित करण्यात आले होते. त्यापूर्वी देशातील अनेक राज्यात सचिन पाटील नावाने फिरत होता. त्यानंतर आता गोसावीची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल आणि त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे,” असे अमिताभ गुप्ता यांनी म्हटले.

“फरार झाल्यानंतर किरण गोसावी सचिन पाटील या नावाने फिरत होता. सचिन पाटील या नावाने हॉटेलमध्ये राहत होता. स्टॉप क्राईम ऑर्गनायझेशन या संस्थेचा तो सदस्स असल्याचे त्याने सांगितले. या व्यतिरिक्त एका गुप्तहेर संस्थेचा सदस् असल्याचे त्याने सांगितले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयात निर्यातीचे काम किरण गोसावी करत होता,” अशी प्राथमिक माहिती त्याने दिल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

किरण गोसावीवर नोकरींच अमिष दाखवत तरुणाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. किरण गोसावीविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरण गोसीवाचा शोध घेताना पुणे पोलिसांचं एक पथक लखनऊतही पोहोचलं होतं. दरम्यान पुणे पोलिसांना अखेर किरण गोसावीला कात्रज येथील एका लॉजमधून अटक केली आहे.

अटक करण्यात आलेलं प्रकरण काय?

२०१८ मध्ये कसबा पेठ परिसरात राहणारा चिन्मय देशमुख हा नोकरीच्या शोधत होता. त्यावेळी त्याची किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांच्या सोबत ऑनलाईन ओळख झाली. या दोघांनी चिन्मयला मलेशियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावतो असे सांगितले. त्यावर त्याच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यानुसार चिन्मयने तीन लाख रुपये दिले. मात्र तरी देखील नोकरी बाबत काही सांगितले गेले नाही. त्यावर अखेर त्यांनी फसवणुक झाल्याची तक्रार दिली होती.

या तक्रारीच्या आधारे किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांना पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याला दोघांनीही काही प्रतिसाद दिला नव्हता. त्यावर दोघा आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली. यानंतर किरण गोसावीची मैत्रीण शेरबानो कुरेशी हिला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तसंच, किरण गोसावीविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली होती.