पुणे : राज्यात दरवर्षी सरासरी ५७ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड केली जाते. ‘ला-निना’च्या प्रभावामुळे थंडीची तीव्रता राहणार असल्याचे यंदा रब्बीचे क्षेत्र ६५ लाख हेक्टर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये हरभरा आणि गहू या प्रमुख पिकाचे क्षेत्र ३० लाख हेक्टरपेक्षा जास्त अपेक्षित आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राज्यातील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामाची राज्यस्तरीय नियोजन बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था येथे झाली. राज्याच्या कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, पोक्राचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक भुवनेश्वरी, स्मार्टचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या महासंचालक वर्षा लढ्ढा यावेळी उपस्थित होते.

भरणे म्हणाले, ‘ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आगामी रब्बी हंगाम महत्त्वाचा ठरणार आहे. रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने बियाणे, खते आणि निविष्ठांचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे.’

‘राज्यात दरवर्षी सरासरी ५७ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड केली जाते. हरभरा आणि गहू या प्रमुख पिकांचे क्षेत्र ३० लाख हेक्टरपेक्षा जास्त अपेक्षित आहे. हवामान विभागानुसार यावर्षी ‘ला-निना’च्या प्रभावामुळे थंडीची तीव्रताही राहणार आहे. ही बाब रब्बी पिकांसाठी अनुकूल ठरणार आहे. रब्बी हंगामासाठी ११.२३ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून राज्यात १४.५८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. खतांचा गेल्या वर्षीचा वापर २५.८ लाख टन होता.

यंदा वाढत्या क्षेत्राचा विचार करून केंद्र सरकाकडे मागणी केल्यांतर ३१.३५ लाख मेट्रिक टन खतांचा साठा मंजूर झाला आहे. त्यापैकी १६.१० लाख मेट्रिक टन खत राज्यात उपलब्ध आहे.’ असे भरणे यांनी स्पष्ट केले.

‘खरीप हंगामात नुकसान भरपाईसाठी २२१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यांनतर ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज आणि नुकत्याच झालेल्या नुकसानासाठी १३५६ कोटींचा निधीही जाहीर करण्यात आला आहे.’ असेही भरणे म्हणाले.

४४.६७ लाख शेतकऱ्यांची निवड

कृषी समृद्धी योजनेअंतर्गत उपलब्ध निधीचा वापर करून चालू वर्षी महा डीबीटीद्वारे ४४.६७ लाख शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण केली जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले.