पुणे : राज्यात अनेक भागांत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्यभरात ९ ऑगस्टपर्यंत ३ लाख ५७ हजार रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रुग्णंसख्या बुलढाण्यात असून, त्यानंतर पुणे, जळगाव, नांदेड आणि चंद्रपूरमध्ये प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे, आठवडाभरात रुग्णसंख्येत सुमारे दीड लाखांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील डोळे येण्याच्या साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ सुरू झाली. ही वाढ दिवसेंदिवस आणखी वाढताना दिसत आहे. राज्यात ३ ऑगस्टला रुग्णसंख्या १ लाख ८७ हजार होती. ती ९ ऑगस्टपर्यंत वाढून ३ लाख ५७ हजारांवर पोहोचली आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिली.
आणखी वाचा-देशाच्या सरासरी तापमानात ०.७ अंश सेल्सिअसने वाढ
राज्यात ९ ऑगस्टपर्यंत डोळे येण्याचे सर्वाधिक ४४ हजार ३९८ रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळले आहेत. त्याखालोखाल पुणे जिल्ह्यामध्ये २८ हजार ४२, जळगाव २२ हजार ४१७, नांदेड १८ हजार १९६ आणि चंद्रपूर १५ हजार ३४८ अशी रुग्णसंख्या आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत ६ हजार ७२० रुग्ण आढळले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ६ हजार १० रुग्ण सापडले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या २ हजार ८६२ आहे.
काय काळजी घ्यावी…
अंकुरा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा बाविस्कर म्हणाल्या की, हा आजार सध्या लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहे. त्याचे मुख्य कारण हाताची स्वच्छता न बाळगणे. कोविडमध्ये हाताची स्वच्छता बाळगली जायची. त्यानंतर हात वारंवार धुणे, सॅनिटायझर वापरणे, मास्क घालणे या चांगल्या सवयी बंद झाल्या आहेत. दुसरा भाग म्हणजे शाळांमध्ये या सर्व गोष्टी मुले पाळत नाहीत. त्यामुळे हा आजार वेगाने पसरत आहे. त्यामुळे या चांगल्या सवयी पुन्हा सुरू कराव्यात.
डोळे येण्याचा आजार कुणालाही होऊ शकतो. परंतु, लहान मुलांमध्ये हा आजार प्रामुख्याने जाणवू शकतो. हा मोठ्या प्रमाणात फैलावतो. परंतु, डोळ्यांची योग्य ती काळजी घेतल्यास आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास यामुळे होणाऱ्या दूरगामी समस्या टाळता येऊ शकतात. हा संसर्ग प्रामुख्याने वातावरणातील बदलामुळे होतो. -डॉ. वंदना कुलकर्णी, नेत्ररोगतज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालय