पुणे विभागीय प्राथमिक फेरी ५, ६ डिसेंबरला

पुणे : महाविद्यालयीन नाटय़विश्वात मानाचे स्थान मिळवलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची पुणे विभागीय प्राथमिक फेरी आता दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण असून दिवसभर कसून तालमी केल्या जात आहेत. ५ आणि ६ डिसेंबला पुणे विभागीय प्राथमिक फेरी रंगणार आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेने गेली काही वर्षे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ दिले आहे. विभागीय प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी व मुंबईत रंगणारी महाअंतिम फेरी असे स्पर्धेचे तीन टप्पे होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आव्हानात्मक असते. तसेच या स्पर्धेकडे मराठी नाटक-चित्रपट-मालिका क्षेत्रातील मान्यवरांचे लक्ष असते. म्हणूनच या स्पर्धेला महाविद्यालयीन नाटय़विश्वात प्रतिष्ठा लाभली आहे.

यंदाही या स्पर्धेविषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. महाविद्यालयांसह पुणे परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद लाभला आहे. प्राथमिक फेरी तालीम स्वरुपात होणार असल्याने महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची तयारी जोरात सुरू आहे.एकांकिकेसाठीच्या नेपथ्यावर शेवटचा हात फिरवणे, आवश्यक असलेले अन्य साहित्य उपलब्ध करणे, पाश्र्वसंगीताचे नियोजन करण्यापासून वेगवेगळ्या कामांमध्ये विद्यार्थी व्यग्र आहेत. त्याच वेळी तालमीही सुरू आहेत.

‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेचे आमचे यंदा दुसरे वर्ष आहे. त्यामुळे स्पर्धेविषयी उत्सुकता आहे. यंदा आमच्या संघात काही नवे कलाकार विद्यार्थी आले आहेत. त्यामुळे जास्त तयारी करत आहोत. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. नाटकाशी संबंधित सारे काही करून पाहता येते.

– निनाद तांबडे, श्रीमती काशिबाई नवले महाविद्यालय

‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा म्हणजे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. तीन टप्प्यांतून एकांकिका जात असल्याने स्पर्धा आव्हानात्मक होते. खऱ्या अर्थाने कस लागतो. त्याशिवाय महाअंतिम फेरी मुंबईत होण्याचे महत्त्व विशेष आहे. म्हणूनच मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीकडेच आमचे लक्ष आहे. त्यामुळे आमची एकांकिका प्रभावी होण्यासाठी, अपेक्षित आशय पोहोचण्यासाठी सादरीकरणावर बारकाईने काम करत आहोत.

– हिमांशू पिले, स. प. महाविद्यालय

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत लोकसत्ता लोकांकिका

* सहप्रायोजक  – मे. बी. जी. चितळे डेअरी

* पॉवर्ड बाय – आयओसीएल

* सपोर्टेड बाय – अस्तित्व

*  टॅलेन्ट पार्टनर – आयरिस प्रॉडक्शन