पुणे : जिल्ह्यातील वन क्षेत्रातील पर्यटनस्थळांचा विकास करण्याच्या दृष्टीने या ठिकाणांचा पर्यावरणपूरक आराखडा करण्याची सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वन पर्यटन विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) जयश्री पवार, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई या वेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात वन क्षेत्रात अतुलनीय अशी पर्यटनस्थळे आहेत. त्यांचा सर्वांगीण विकास केल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. त्या दृष्टीने पुणे वन विभागांतर्गत राजगड तसेच अन्य किल्ले, जुन्नर वन विभागांतर्गत विविध घाट, धबधबे, डोंगर आदींच्या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सुविधा पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्याबाबत आराखडा सादर करावा,असे डुडी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘राजगड पायथा येथे वन विभागाच्या कार्यक्षेत्रात सुविधा निर्माण करण्याची संधी आहे. त्या निर्माण करताना वन विभागाचे नियम, मानके लक्षात घ्यावी लागतील. स्थानिक दगड, माती, लाकूड आदींचा वापर करून पर्यावरणपूरक विकास करावयाचा आहे. पर्यटक अधिकाधिक भेटी देतात, अशी ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी दगडी बाकडे, स्वच्छतागृहे, आवश्यक त्या ठिकाणी दगडी पायऱ्यांचा वापर करून लहान रस्ते, लाकडी बॅरिकेटिंग, रेलिंग आदी सुविधा देणे शक्य आहे.
‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रात करावयाच्या कामांसाठी संबंधित विभागाची ना-हरकत घेऊन कामे करावी. राजगड किल्ला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्यामुळे येथे विविध सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकेल, असेही डुडी यांनी स्पष्ट केले.
चौकट
सुविधांचा आराखडा सादर
दरम्यान, नाणेघाट, दाऱ्याघाट, आंबोली, कांचन, काळू, धूरनळी धबधबे, दुर्गवाडी कोकणकडा, भिवेगाव खेड कुंड, कुंडेश्वर निसर्ग पर्यटन, शिंगेश्वर मंदिर टेकडी, भामचंद्र डोंगर, तुकाईमाता मंदिर, अरण्येश्वर मंदिर, शिरूर ऑक्सिजन पार्क या ठिकाणी करावयाच्या पर्यटक सुविधांच्या अनुषंगाने आराखडाही या बैठकीत सादर करण्यात आला.