पुणे : धार्मिक सद्भाव, वैज्ञानिकता आणि मानवता वृद्धिंगत करण्यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने बकर ईदनिमित्त शनिवारी (७ जून) राज्यस्तरीय रक्तदान अभियान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच मरणोत्तर अवयव आणि देहदान करण्याचा संकल्प व जनजागरण कार्यक्रमही आयोजित करण्यात येतो.
राष्ट्र सेवादलाच्या साने गुरुजी स्मारक येथील बॅ. नाथ पै सभागृह येथे शनिवारी सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच या कालावधीत या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. या ईदला कुर्बानीची ईद असेही म्हणतात. त्याग, समर्पण, दानधर्म या उदात्त भावनांचे उन्नयन आणि सामाजिक कर्तव्याच्या शिकवणीचे स्मरण या ईदनिमित्त करण्यात येते.
असे धार्मिक सण अधिकाधिक समाज व मानवताभिमुख होऊन भारतीय समाजात विज्ञाननिष्ठ संस्कृती रुजावी, यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाने या अभियानाची सुरुवात केली आहे, असे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शमसुद्दीन तांबोळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.