पुणे : शहर आणि परिसरात गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. शाळा आणि कार्यालयीन कामासाठी निघण्याच्या वेळेतच जोरदार पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ झाली. रेनकोटसह इतर साधने असूनही अनेक नागरिक चिंब झाले. ही तारांबळ असतानाच जागोजागी तुंबलेली ड्रेनेज, रस्त्यांवरील खड्डे, साचलेले पाणी, मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना बसला. महापालिकेकडे दिवसभरात पाणी साचल्याच्या ९० तक्रारी आल्या.
पावसामुळे कोथरूड, कर्वेनगर, बावधन, सूस, नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्ता, औंध, बोपोडी, हडपसर, धानोरी, येरवडा भागातील रस्त्यांवर पाणी साचले. शहरात विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका नोकरदारांना बसला. कोंडीबरोबरच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली.
पाऊस जोरात झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीच्या यंत्रणेवर ताण आल्याचे पाहायला मिळाले. पावसाळी गटारे आणि महापालिकेने पाणी वाहून जाण्यासाठी तयार केलेल्या ड्रेनेज लाइनमध्ये कचरा अडकल्याने काही भागांत पाणी वाहून जाण्यामध्ये अडथळे निर्माण झाले. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवर साचले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक संथ झाली होती. वाहनांच्या रांगा रस्त्यांवर लागल्या होत्या.
महापालिकेने सुरू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे दिवसभरात विविध भागांतील रस्त्यांवर पाणी साचल्याच्या ९० तक्रारी आल्या. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, की नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर त्याची तातडीने दखल घेऊन संबंधित भागांतील क्षेत्रीय कार्यालयाला माहिती दिली जात होती. त्यानंतर महापालिकेचे पथक तेथे जाऊन तक्रार निवारण करीत होते. महापालिकेचे पथक घटनास्थळी गेल्यानंतर १० ते २५ मिनिटांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचा दावा सोनुने यांनी केला.
रस्त्यांवर साचलेले पाणी काढण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी सकाळपासूनच कामाला लागले होते. पथ विभाग, मलनिस्सारण विभागील कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी चेंबरचे झाकण उघडून पाण्याच्या प्रवाहाला वाट करून दिली. अनेक भागांत पाण्याचा निचरा करण्याची कामे कमी वेळेत झाल्याने वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली, असा दावा महापालिकेने केला.
या भागांत साचले पाणी
- धायरी भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. नऱ्हे, आंबेगाव, सिंहगड रस्ता, नवले पूल ते वारजे भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
- बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावर चेंबर तुंबल्याने पाणी साचले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ड्रेनेजचे झाकण उघडून कचरा काढला. त्यानंतर पाणी वाहून गेले.
- पर्वतीकडून नीलायम चित्रपटगृहाजवळील पुलाजवळ झाड पडले. झाडाच्या फांद्या, कचरा चेंबरवर पडल्याने पाणी साचले.
- आठवले चौक ते प्रभात रस्ता कॅनॉल रस्त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराकडे जाणाऱ्या गल्लीच्या परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते.
- स्वारगेट चौक आणि हडपसरमधील सिद्धेश्वर हॉटेलसमोर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले.
- उपनगरांसह मध्यवर्ती पेठांचा भाग असलेल्या सदाशिव, नारायण, शनिवार पेठेसह छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि इतर रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाली.
एकतानगरीसाठी स्वतंत्र पथक
गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील नदीकाठाजवळ असलेल्या एकतानगरी सोसायटीत पाणी घुसले होते. यंदा एकतानगरीला फटका बसू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे, असे उपायुक्त संदीप खलाटे यांनी सांगितले.
शहरात गुरुवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. खडकवासला धरणातून काही प्रमाणात पाणी सोडण्यास सुुरुवात झाली आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जाऊन नागरिकांना आवाहन करीत आहेत. नदीकाठच्या नागरिकांनाही धोक्याचा इशारा दिला आहे. आतापर्यंत खडकवासल्याजवळील १२ ते १५ घरे वगळता इतर कुठेही पाणी शिरलेले नाही. – गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पुणे महापालिका.