Raj ThRaj Thackeray Pune Sabha Speech Live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका घेतल्यापासून ते कायम चर्चेत राहिले आहेत. या वादग्रस्त मुद्द्यावरून त्यांनी आक्रमक होत आधी पाडवा मेळावा, नंतर ठाण्यात उत्तर सभा आणि नंतर पुन्हा मुंबईत झालेल्या सभांमधून तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यातच राज ठाकरेंचा अयोध्या दौरा, त्याला भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी केलेला विरोध आणि त्यानंतर राज ठाकरेंनी स्थगित केलेला दौरा या सगळ्याच मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असताना राज ठाकरेंनी आज पुण्यात घेतलेल्या सभेमध्ये अनेक मुद्द्यांवरून चौफेर टोलेबाजी केली.
या सभेमध्ये आता राज ठाकरेंच्या निशाण्यावर नेमकं कोण असणार? याची उत्सुकता ताणली गेली आहे.
Raj Thackeray Pune Rally Live Updates : अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत यावर सविस्तर बोलू, असं आवाहन सगळ्यांना केलं होतं.
पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन-चार आठवडे रिकव्हरीसाठी जाईल. त्यानंतर महिना-दोन महिन्यांनी पुन्हा तुमच्यासमोर येईन. तूर्तास हे आंदोलन चालू ठेवायचं आहे. त्यासाठीचं पत्र सर्व हिंदू बांधवांच्या घरी पोहोचवायचं आहे.
आंदोलनं होतील, होत राहतील. करायची आहेत. पण काळजी नसावी, टीम तयार आहे.
संदीप देशपांडेला पोलीस शोधत होते. संदीपच्या बायकोनं फ्रीज उघडून दाखवला ..अहो नाहीये घरात. या सगळ्या आंदोलनात महत्त्वाची गोष्ट… मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांचे, पक्षाचे आभार आहेत. पण आपल्या विधी विभागाचे आभार मानीन की सगळ्या ठिकाणी वकील मंडळी उभी राहिली आणि आपल्या पोरांना ताबडतोब बाहेर काढण्यात आलं.
२८ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा गेल्या. जो कायदा पाळा सांगतो, त्याला नोटिसा बजावणार. अटक करणार. जे कायदे पाळत नाहीत, त्यांच्यासोबत चर्चा करणार. क्या लगता है अस्लम भाई, आपको कितना लगता है. कितना साऊंड होना चाहिये. यात चर्चा काय करायची आहे?
मी एक पत्र तुम्हाला देणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की घराघरात ते पत्र पोहोचलं पाहिजे. हे आंदोलन आहे. प्रत्येक वेळी ते रस्त्यावरच केलं पाहिजे असं नाही. पण त्यांचं सहकार्य आवश्यक आहे. तर या गोष्टी बंद होतील.
भोंग्यांचं आंदोलन एका दिवसाचं नाही. या गोष्टीला सातत्य नसेल, तर पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू होणार. ते फक्त तुम्हाला तपासत आहेत. हे विसरले, की हळूहळू आवाज वर यायला सुरू होणार. आत्ता सुरू केलंय ना, एकदाचा तुकडा पाडून टाका.
या थंड बसण्यामध्ये, काहीही न करण्यामध्ये या देशावर ९०० वर्ष परकीयांनी सत्ता गाजवली. मधला सव्वाशे वर्षाचा इतिहास बाजूला काढला तर ९०० वर्ष हा देश पारतंत्र्यात होता. गजनीचा मोहंमद आल्यापासून आत्तापर्यंत. १९४७ साली ही भूमी स्वतंत्र झाली. ही मंडळी आत आली कशी? कारण आम्ही बेसावध होतो.
एका शेतकऱ्याने साखर कारखान्याने ऊस घेतला नाही म्हणून आख्खं शेत पेटवून दिलं आणि आत्महत्या केली. पण त्याची एवढीशी बातमी आली आणि सगळे विसरून गेले. आम्ही थंड गोळे.
भोंग्यांचा विषय आपण काढला, तेव्हा भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सकाळच्या अजान बंद झाल्या. जवळपास ९२ ते ९४ टक्के ठिकाणी आवाज कमी झाले. माझी मागणी लाऊडस्पीकरच निघण्याची आहे. पण तुम्ही जोपर्यंत असे वेंधळ्यासारखे राहणार, तोपर्यंत ही माणसं अशीच घुसत राहणार.
मला वाटलं औरंगजेबाच्या कबरीवर एमआयएमचा माणूस गेल्यावर महाराष्ट्र खवळेल. पण महाराष्ट्र थंडच. ज्याचा कोथळा शिवछत्रपती बाहेर काढतात. त्याची एवढीशी कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बघून या. त्याचा विस्तार आज १५ ते २० हजार फुटात झालाय. अफजलखानाची मशीद तिथे उभी राहिली आहे. त्यासाठी फंडिंग येतंय. हे फंडिंग देणाऱ्या अवलादी कोण आहेत? कारण आम्ही शांत बसलो आहोत. आम्हाला कसलंही देणं-घेणं नाहीये. आम्ही लोण्याचे थंड गोळे आहोत.
हे सत्तेत इतके मश्गूल आहेत की यांना कशाची पर्वा नाहीये. कारण महाराष्ट्रातली जनता बेपर्वा वागते. निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि भलत्याच गोष्टीवर मतदान करायचं.
तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? यांचं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरून हे चालणार. काल शिवसेनेतलं कुणी बोललं की महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं.
शिवसेनेचा तिथला खासदार पडला आणि एमआयएमचा निवडून आला. आमच्याच महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला त्या औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवतात. आणि आम्हाला लाज वाटत नाही. सत्ताधारीच असे बसले आहेत. आता आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल, तर यापलीकडे काय बोलायचं? अफजलखान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे.
मागच्या सभेत मी म्हणालो होतो की पंतप्रधानांना विनंती आहे की लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा. देशाच्या लोकसंख्या नियंत्रणासाठी अजून एक कायदा आणावा आणि तिसरी विनंती म्हणजे औरंगाबादचं लवकरात लवकर संभाजी नगर हे नाव बदलून टाका. यांचं राजकारण एकदा मोडीतच काढा. यांच्या राजकारणासाठी हिंदु-मुसलमान मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमला मोठं केलं. एमआयएम सतत हिंदुंविरोधात बोलत राहिली पाहिजे. ज्यातून यांची रोजीरोटी चालेल. यांच्या लक्षात आलं नाही की आपण एक राक्षस वाढवतोय. म्हणता म्हणता यांच्या राजकारणात एमआयएमचा खासदार झाला. निजामाच्या औलादी महाराष्ट्रात वळवळायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन यांनीच करून दिली.
परवा म्हणाले, संभाजीनगरचं नामांतर झालं, नाही झालं फरत पडत नाही. मी बोलतोय ना. तू कोण आहेस? मी बोलतोय याला काय लॉजिक आहे? इतकी वर्ष केंद्रात सरकार होतं, आजपर्यंत संभाजीनगरचा प्रश्न मिटवला का? कारण तो सतत निवडणुकांसाठी जिवंत ठेवायचा आहे. याच गोष्टी फक्त यांना करायच्या आहेत. उद्या नामांतर झालं, तर प्रश्नच मिटला. मग बोलायचं कशावर? अनेक शहरांमध्ये १०-१० दिवस पाणी येत नाहीये. ते विषयच नाहीत.
मला एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं. टोलनाक्याच्या आंदोलनानंतर ७० टोलनाके महाराष्ट्रातले बंद झाले. बाकीच्या पक्षांची काहीच जबाबदारी नाही का? मुंबईत बॉलिवुडमध्ये पाकिस्तानी कलाकार येत होते. या देशातून हाकलून दिलं त्यांना. कुठे होते त्यावेळी हिंदुत्वाची पकपक करणारे? जेव्हा रझा अकादमीच्या लोकांनी मोर्चा काढला आणि पोलीस भगिनींना घोळका करून त्यांच्या अब्रूवर हात घालण्यात आला. बाहेरचे मुसलमान तिथे आले होते. त्याच्याविरोधात फक्त मनसेनं मोर्चा काढला. बाकी कुणी नाही काढला. कोणतं हिंदुत्व बोलताय तुम्ही? उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट सांगावी की तुमच्या अंगावर एका तरी आंदोलनाची केस आहे का? भूमिकाच कुठली घ्यायची नाही.
जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत.. आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीसाठी तिथून हजारो लोक महाराष्ट्रात रेल्वे स्टेशनवर आले. आपले लोक त्यांच्याशी बोलायला गेले होते. तिथे बोलता बोलता त्या बाचाबाचीत तिथल्या एका मुलाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. आणि जे सगळं प्रकरण सुरू झालं.ते तिथून झालं. पण महाराष्ट्रात रेल्वे भरती होती याच्या जाहिराती महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रात कुठेही नाही. पण त्याच्या जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारच्या वर्तमानपत्रात येत होत्या. तिथल्या रेल्वेभरतीमध्ये तिथल्या मुलांना नोकऱ्या मिळायला हव्यात. महाराष्ट्रातल्या भरतीमध्ये इथल्या मुलांना नोकऱ्या मिळायला हव्यात. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्यानंतर स्थानिक भाषांमध्ये परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला. हे त्या आंदोलनाचं यश आहे.
मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जे आम्ही देतो.
ज्यांच्यामुळे हे सगळं घडल, त्यांच्यासोबत तुम्ही लडाखमध्ये जेवताय? हे सगळे ढोंगी आहेत. यांचं हिंदुत्व पकपकपक बोलण्यासाठीच आहे. यांना दुसऱ्या गोष्टी नको आहेत.
गुजरातमध्ये कुणाला माफी मागायला लावणार आहात? हे अचानक आत्ता कसं सुरू झालं? ज्यांना आपलं हिंदुत्व, लाऊडस्पीकर झोंबले, आपल्याविरोधात सगळे एकत्र येतात. अन्यथा भांडत असतात. मी म्हटलं जर मशिदीवर बांग जोरात लागली तर त्याच्यासमोर हनुमान चालीसा लावा. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणायला गेले. ती काय मशीद आहे का? त्यांना अटक केली. मधु इथे आणि चंद्र तिथे असे अटक झाले. नंतर त्यांना सोडण्यात आलं. शिवसेनेकडून त्यांना वाट्टेल ते बोललं गेलं. एवढा राडा झाल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांना या गोष्टीचं काहीच वाटत नाही?
आत्ता जाग आली? राज ठाकरेंनी माफी मागावी वगैरे? १२-१४ वर्षांनी आठवण आली का? तेव्हा ही माणसं कुठे होती? यातून चुकीचे पायंडे पडतायत हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणे राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय पाय ठेऊ देणार नाही. विषय माफी मागण्याचाच आहे, तर गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाचे सदस्य आहेत. गुजरातमध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिथल्या उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांना मारलं, एका रात्रीत १०-१५ हजार बिहारी, उत्तर प्रदेशवाल्यांना हाकलून लावण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार आहे?
एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य तरी आहे का? याला अनेक पापुद्रे आहेत. काही तर असे आहेत, ज्यावर मला बोलताही येणार नाही. महाराष्ट्रातली माझी ताकद हकनाक तिथे अडकली असती. ती मला तिकडे सापडू द्यायची नव्हती. मी म्हटलं टीकाही सहन करायला तयार आहे, पण पोरं अडकू देणार नाही.
मला राम जन्मभूमीचं दर्शन घ्यायचं होतंच, पण जिथे माझे कारसेवक मारले गेले, त्या जागेचंही दर्शन मला घ्यायचं होतं. राजकारणात भावना अनेकांना समजत नसतात. असो. पण ज्या प्रकारचा माहौल तिथे उभा केला जात होता…मी उद्या जर तिथे जायचं ठरवलंच असतं, तर महाराष्ट्रातून अनेक बांधव तिथे आले असते. तिथे जर काही झालं असतं, तर आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, जेलमध्ये सडवलं गेलं असतं आणि हकनाक काही कारण नसताना तो ससेमिरा तुमच्या पाठिशी लावला असता. म्हटलं मी आपली पोरं हकनाक घालवणार नाही अशी. या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर देखील केसेस टाकल्या असत्या आणि ऐन निवडणुकीच्या वेळी इथे कुणीच नसतं. हा सगळा सापळा होता.
ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली, असे अनेक जण होते. त्या सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून आराखडा आखला गेला. मी एकाच गोष्टीचा विचार केला. मी अयोध्येला जाणार, याचा जो विचार मनात होता.. रामजन्मभूमीचं दर्शन घेणं आलंच. पण मला वाटतं तुमच्यापैकी अनेकजण तेव्हा जन्मालाही आले नसतील. तेव्हा आजच्यासारखे चॅनल्स नव्हते. तेव्हा फक्त दूरदर्शन हे एकच चॅनल होतं. तेव्हा दूरदर्शनवर न्यूज रील्स चालवायचे. मला आजही आठवतं जेव्हा मुलायमसिंह सरकार उत्तर प्रदेशात होतं, भारतातून सर्व ठिकाणाहून कारसेवक अयोध्येला गेले, तेव्हा आपल्या सर्व कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं. त्या सर्व कारसेवकांची प्रेतं शरयू नदीत तरंगताना मी पाहिली होती.
ज्या दिवशी आपण लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली, तेव्हा पुण्यात अयोध्येला जाण्याची तारीख जाहीर केली. त्यानंतर काही दिवसांतच हे प्रकरण सुरू झालं. अयोध्येला येऊ देणार नाही वगैरे. मी सगळं पाहात होतो काय चाललंय ते. मला मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती. एक वेळ अशी आली की मला लक्षात आलं की हा सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकायला नको. कारण या सगळ्या गोष्टींची रसद महाराष्ट्रातून सुरू झाली.
सभेचं आयोजन करण्यामागचं कारण… मी ट्विटरवर टाकलं की अयोध्या दौरा तूर्तास रद्द.. अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झाला. अनेकजण कुत्सितपणे बोलायला लागले. म्हणून मी दोन दिवसांचा बफर दिला होता. काय बोलायचं ते बोलून घ्या एकदा. आणि मग मी महाराष्ट्राला, देशाला माझी भूमिका सांगेन.
येत्या १ तारखेला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, की आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही. म्हटलं आपणच सांगितलेलं बरं.
आपल्या सभांना हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं एसपी कॉलेज बघा. त्यांनी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह दिसतायत. मी म्हटलं निवडणुका नाहीत, काही नाही, उगीच कशाला भिजत भाषण करा.
नए नए मुख्यमंत्री ने अपने ड्रायव्हरसे कहा…
आज कार हम चलाएंगे..
ड्रायव्हर बोला, हम उतर जाएंगे..
चलाकर तो देखिए, आप की आत्मा हिल जाएगी..
यह कार है, सरकार नहीं जो भगवान के भरोसे चल जाएगी…
संजय राऊतांमध्ये कादर खान घुसलाय. एका सिनेमात कादर खानला रातांधळेपणा होता. संजय राऊतांना दिवसांधळेपणा झालाय. काहीही झालं की ते बोलत सुटतात.
हे दुर्दैवं आहे माझं. मला सारखं का सांगावं लागतंय की मी मनसेत आहे. कोण यामागे आहे. कुणीतरी या सगळ्या गोष्टी घडवून आणतंय. मला जाणून बुजून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी राज ठाकरेंसमोर या गोष्टी मांडणार आहे. या गोष्टी राज ठाकरेंपर्यंत गेल्याच नसतील. त्यांना इथे काय चाललंय ते माहितीच नसेल. मी याबाबत पुण्यातील पक्षाच्या नेत्यांच्या कानावर गोष्टी घालतोय. गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून मला सांगायला लागतंय की मी मनसेत आहे. हे झारीतले शुक्राचार्य शोधले पाहिजेत. त्यांच्यावर कारवाया व्हायला पाहिजेत. कोण पक्षातून कुणाला बाहेर घालवायला बघतंय त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत.
“मला राज ठाकरेंनी याबाबत विचारणा केली, तर मी त्यांना सांगेन. कारण संयम तुटण्याची वेळ कधीकधी येते. माझ्यापर्यंत विषय होता, तेव्हा मी सगळ्या गोष्टी रेटून नेत होतो. पण आज माझ्या कार्यकर्त्यांपर्यंत विषय आला आहे. मला वाटतं पदाधिकारी हा पदाधिकारी असतो. तो कधीच कुणाचा नसतो. तुम्ही त्याला व्यवस्थित वागणूक दिली, तर तो तुमच्यासोबतच असतो. इथे वसंत मोरे किंवा अजून कुणाचा ग्रुप नाही. तो पक्षाचा ग्रुप आहे. राज ठाकरेंना मानणारा ग्रुप आहे. पक्षात मतभेद असतात. पण आता मतभेद कुठेतरी मनभेदापर्यंत जायला लागले आहेत. ते जाऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करतोय. पण वेगवेगळ्या माध्यमातून हे दाखवलं जातंय की आम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रविवारी (२२ मे) होणाऱ्या सभेला पोलिसांनी अटी, शर्थींवर परवानगी दिली आहे. धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये सभेत करू नयेत, आदी विविध अटी पोलिसांनी घातल्या आहेत.
स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रविवारी सकाळी दहा वाजता राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावून वातावरण निर्मिती केली आहे. या सभेला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून रविवारी सकाळपासून स्वारगेट परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकावरून मोठा वाद निर्माण झाला होता.