पुणे: सध्या अवघ्या देशभर टोमॅटोची चर्चा आहे. दरवाढ झाल्याने प्रत्येक घरात जाणारा टोमॅटो सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे टोमॅटोमध्ये गणपती बाप्पाची प्रतिकृती दिसल्याने त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळे हा देखील चर्चेचा विषय ठरत आहे. टोमॅटोमध्ये हुबेहूब गणपती बाप्पाच अवतरले असल्याचा साक्षात्कार होतो. उत्तर प्रदेशातील शिवराज बिंदला टोमॅटो निवडत असताना बाप्पा सारखा टोमॅटो दिसला.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर (नारायणगाव) येथून अवघ्या देशभर टोमॅटो जातो. मोठ्या प्रमाणावर येथील शेतकरी टोमॅटोची लागवड करतात. देशभरातून हजारो कामगार देखील काम करण्यास येत असल्याचे चित्र आहे. पैकी शिवराज बिंद हा टोमॅटो वेगवेगळ्या कॅरेटमध्ये टाकत असताना चक्क टोमॅटोमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन झालं, टोमॅटोमध्ये गणपतीचं रूप दिसलं. टोमॅटोमध्ये गणपती बाप्पाची उबेहूब प्रतिकृती त्याला दिसली. गणपती बाप्पा सारख्या दिसणाऱ्या टोमॅटोसोबत त्याने फोटो घेतला. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा-पुणे: ‘इझी पे’ कंपनीच्या प्रतिनिधींकडून साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक
एकीकडे टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिक मेताकुटीला आलेला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना अच्छे दिन आल्याने शेतकरी आनंदी असल्याचं बघायला मिळत आहे. असाच भाव टोमॅटोला राहिल्यास अवघ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सुखी होईल यात काही शंका नाही. टोमॅटोच्या रुपात जणू गणपती बाप्पाने शेतकऱ्याला सुखी होण्याचा आशीर्वादच दिला आहे असं म्हणायला हरकत नाही.
