पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याने मोठ्या रुग्णालयांची मदार खासगी मनुष्यबळावर आहे. महापालिकेच्या नऊ रुग्णालयांत खासगी संस्थेद्वारे मनुष्यबळ पुरविले जाणार आहे. त्यावर तीन वर्षांसाठी २८३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची वायसीएमसह नऊ माेठी रुग्णालय आहेत. शहर, जिल्ह्यासह राज्यभरातून रुग्ण येथे उपचारासाठी येतात. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने खासगी संस्थेद्वारे मनुष्यबळ उपलब्ध केले जाते. रुग्णालयांसाठी मनुष्यबळ पुरविण्याकरिता वैद्यकीय मुख्य कार्यालयाने २१ सप्टेंबर २०२४ रोजी निविदा प्रसिद्ध केली. नवीन थेरगाव, पिंपरीतील नवीन जिजामाता, आकुर्डीतील प्रभाकर कुटे आणि चिंचवड येथील तालेरा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, इतर, तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यासाठी ११६ कोटी तीन लाख ४३ हजार ९७२ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यात तीन संस्थांनी सहभाग घेतला.
त्यातील दोन संस्था पात्र ठरल्या. रुबी अलकेअर सर्व्हिसेस या संस्थेचा ९.८ टक्के लघुतम दर महापालिकेने स्वीकारला. त्यांना या चार रुग्णालयांत मनुष्यबळ पुरविण्याचे काम देण्यात आले. तर, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय, नेत्र रुग्णालय, वायसीएमधील शवविच्छेदन विभाग, कुटुंब कल्याण केंद्र, नवीन भोसरी, सांगवी, यनुमानगर या पाच रुग्णालयांसाठी सर्व मनुष्यबळ पुरविण्याचे काम ‘बीव्हीजी’ इंडियाला देण्यात आले. ‘बीव्हीजी’ने लघुतम ९.८ टक्के अंतिम सेवाशुल्क दर सादर केला होता. त्यांची निविदा स्वीकारून या पाच रुग्णालयांत मनुष्यबळ पुरविण्याचे काम ‘बीव्हीजी’ला देण्यात आले. तीन वर्षांसाठी त्यांना ११९ कोटी ८० लाख ९९ हजार असे एकूण नऊ रुग्णालयांसाठी येणाऱ्या २८३ कोटी रुपये खर्चाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
याबाबत महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण गाेफणे म्हणाले, ‘वैद्यकीय विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे रुग्णालयांत खासगी संस्थेमार्फत वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा देण्यास मदत हाेते. खासगी कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची देखरेख असणार आहे.