पुणे : बदलापूर येथील दोन शाळकरी चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेच्या निषेधार्थ काल बदलापूर रेल्वे स्थानकावरील नागरिकांनी तब्बल १० तास रेल्वे रोखून ठेवली होती. या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गुडलक चौकात शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, असे फलक घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनामध्ये अजित पवार यांनी देखील राजीनामा द्यावा असे फलक आहेत आणि कार्यकर्त्यांनी घोषणा देखील दिल्या आहेत. त्यामुळे अजित पवारांनी देखील राजीनामा द्यावा का या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर देण्याचे टाळले .या प्रश्नावर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना भूमिका मांडण्यास सांगितले.
आणखी वाचा-शाळकरी मुलीला दारू पाजून बलात्कार, अल्पवयीनांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा
नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा : सुप्रिया सुळे
राज्यातील महिला, लहान मुलीवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारने पावले उचलली पाहिजे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे कोणाचेही लक्ष नाही.आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी मंडळींना जी सुरक्षा पुरविली जाते. हे लक्षात घेतल्यावर माझी सुरक्षा काढून राज्यातील महिलांना ती सुरक्षा पुरविण्यात यावी अशी माझी मागणी आहे. तसेच बदलापूर येथील घटनेबाबत सांगायचे झाल्यास, लहान मुलीवर ज्या दिवशी घटना घडली. त्याचवेळी आरोपी विरोधात कारवाई केली पाहिजे होती. त्यामुळे या विभागाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. तसेच महाविकास आघाडी सरकाराच्या कालावधीत दिशा कायदा आणण्यासाठी पावले उचलली गेली होती. त्यानंतर आलेल्या महायुतीच्या सरकारने काय कार्यवाही केली. याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी देखील त्यांनी केली.