पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात साकारण्यात येत असलेल्या केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या सजावटीचा वासापूजनाने रविवारी श्रीगणेशा झाला. कोतवाल चावडी येथील जय गणेश प्रांगण येथे ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आमदार हेमंत रासने, अमोल केदारी, अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते वासापूजन करण्यात आले.

पद्मनाभ स्वामी मंदिराची सजावट १२० फूट लांब, ९० फूट रूंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये ३० भव्य खांब असून, ५०० देवी-दैवता, ऋषी-मुनी यांच्या मूर्ती असणार आहेत. गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून, संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून, भाविकांना लांबून सहजतेने गणरायाचे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक विनायक रासकर ही सजावट साकारत आहेत.