पिंपरी : ‘ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन ठाकरे एकत्र येत असल्याने सर्वांचेच हित आहे. ठाकरेंना कोणतीही ताकद संपवू शकत नाही’ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
हिंजवडीतील समस्यांची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुळे म्हणाल्या, ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे देशासाठी आणि राज्यासाठी योगदान राहिले आहे. जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा याचा उल्लेख होईल. बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान कोणीही विसरू शकणार नाही. मोठ्या विश्वासाने आणि शून्यातून त्यांनी शिवसेना उभी केली आहे.
ठाकरे हे केवळ आडनाव नाही. शिवसेनेतील प्रत्येक कार्यकर्ता हा ठाकरे आहे. ठाकरे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य एकत्र येत असतील तर त्याचे मनापासून स्वागत आहे. मराठी माणसासाठी ते एकत्र येत आहेत. त्यात सर्वांचेच हित आहे. यश, अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. ठाकरेंना कोणतीही ताकद संपवू शकत नाही’.
‘केंद्र सरकारच्या अहवालात महाराष्ट्रातील गुन्हेगारीत वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. हा अहवाल विरोधकांनी नाही तर सरकारने तयार केला आहे. पुण्यातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. पुण्यात घरात शिरून एकाने संगणक अभियंता तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या वाढत्या गुन्हेगारीला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे’, असा आरोप खासदार सुळे यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असल्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत, याबाबत विचारण्यात आले असता खासदार सुळे म्हणाल्या, ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काहीच चर्चा नाही. देशाच्या, राज्याच्या सेवेच्या कामात आम्ही सर्व व्यस्त आहोत.’