पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा करावा, अशी सूचना जिल्हा प्रशासनाकडून तहसीलदारांना करण्यात आली असून, त्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. प्रभागाचा प्रारूप आराखडा १४ जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनाला सादर केला जाणार आहे.
राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार, राज्याचा नगरविकास विभाग तसेच ग्रामविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रभागरचनांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट, गण रचना करण्याचे आदेश यापूर्वीच ग्रामविकास विभागाने काढले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी संबंधित भागातील लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती आणि आरक्षणाचे निकष लक्षात घेऊन प्रारूप आराखड्याचे काम सुरू केले आहे. प्रारूप प्रभाग आराखडा सादर करण्याची मुदत १४ जुलैपर्यंत आहे, अशी माहिती समन्वय अधिकारी चारुशीला देशमुख यांनी दिली.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडे सर्व तालुक्यांकडून प्रारूप आराखडा प्राप्त होताच त्याची तपासणी तसेच दुरुस्ती केली जाईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समितीच्या नोटीस बोर्डासह संकेतस्थळावर प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर २१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती आणि सूचना सादर करण्यात येणार आहेत. त्या हरकतींनुसार जिल्हाधिकारी अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, त्यावर पुन्हा हरकती घेऊन सुनावणी घेतली जाईल.
नगर परिषदांचा आराखडा २५ जुलैपर्यंत
‘येत्या २५ ते २९ जुलैपर्यंत नगर परिषदांकडून. तसेच नगर पंचायतीकडून ३० जुलै ते सहा ऑगस्टपर्यंत प्रारूप आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत,’ असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.