महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस

ढगाळ स्थितीमुळे तापमानात चढ-उतार होत असून, राज्यात सर्वच ठिकाणी सध्या कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. दोन ते तीन दिवसांत राज्यात सर्वत्र कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होणार असल्याने ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दरम्यान, शनिवारी (१४ डिसेंबर) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी दाट धुके पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मध्य भारतात कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मध्य प्रदेशच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्याचा परिणाम राज्यावर आणि प्रामुख्याने विदर्भावर होत आहे. ढगाळ स्थितीमुळे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, गोंदिया या भागातील किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांपेक्षा अधिक होऊन थंडी गायब झाली आहे.

मराठवाडय़ातील तापमानातही वाढ झाली आहे. गेल्या आठवडय़ात या भागातील तापमान सरासरीच्य़ा आसपास येऊन थंडी पडली होती. मध्य महाराष्ट्रातही अंशत: ढगाळ स्थिती असल्याने तापमानात वाढ झाली आहे. राज्यात सर्वच ठिकाणी दोन ते तीन दिवसांमध्ये ढगाळ स्थिती निवळून कोरडे हवामान होणार आहे. सध्या हिमालयाच्या परिसरात हिमवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत. कोरडय़ा हवामानामुळे या वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असल्याने थंडीला पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान सरासरीजवळ येऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये सर्वात कमी तापमान

शुक्रवारी, १३ डिसेंबर नाशिक येथे सर्वात कमी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरचे किमान तापमान सरासरी इतकेच म्हणजे १३.५ अंशांवर आहे. मुंबईतही तापमानात किंमान घट होऊन ते २२ अंशांवर आले आहे. पुण्यातील किमान तापमान १५.९ अंश नोंदविले गेले. औरंगाबाद येथे १७.६, तर नागपूर येथे १७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.