पुणे : वडगाव शेरी भागात टोळक्याने दहशत माजवून वैमनस्यातून दोन तरुणांवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या घटनेत दोघे जण जखमी झाले असून, टोळक्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

उद्देश विलास शिंगारे (वय २७, रा. माळवाडी, वडगाव शेरी), यश टारगे (वय १९, रा. करण रिहा सोसायटी, वडगाव शेरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शिंगारे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, आठ ते दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव शेरी भागात सत्यम सेरिनेटी सोसायटीजवळ मंगळवारी (६ ऑगस्ट) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा >>>पुणे जिल्ह्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५ लाख ९० हजार ६११ मतदार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंगारे आणि त्याचे मित्र यश टारगे, विश्वजीत पवार, सिद्धार्थ शेलार, सार्थक धुमाळ आणि लखन पवार गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी चार ते पाच दुचाकींवरून आठ ते दहा जण तेथे आले. त्यांनी शिंगारेला शिवीगाळ केली. ‘विश्व्या कुठे आहे. तु त्याच्याबरोबर का राहतो ?’, अशी विचारणा केली. टोळक्याने शिंगारेवर कोयत्याने वार केला. त्यानंतर मध्यस्थी करणाऱ्या टारगेवर कोयत्याने वार केले. आरडाओरडा ऐकून नागरिक तेथे जमा झाले. टोळक्याने काेयते उगारून दहशत माजविली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पसार झालेल्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर तपास करत आहेत.