पुणे : पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिला मृत्युमुखी पडल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील चव्हाणनगर परिसरात घडली. अपघातात दुचाकीस्वार पती आणि मुलगा जखमी झाला. याप्रकरणी टँकरचालकाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रुमी अजित पाल (वय २७, रा. संतोषनगर, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार पती अजित (वय ३१) आणि मुलगा जखमी झाला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अजित पाल, त्यांची पत्नी रुमी आणि मुलगा हे पुणे-सातारा रस्त्यावरून शनिवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास निघाले होते. धनकवडीतील चव्हाणनगर परिसरातील कमानीजवळ भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिली. अपघातात पाल कुटुंबीय गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिक, तसेच पोलिसांनी तिघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच रुमी यांचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंधरा दिवसांत दहा जणांचे बळी

शहर परिसरात गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पंधरा दिवसांत शहरातील वेगवेगळ्या भागांत झालेल्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन अल्पवयीनांचा समावेश आहे. डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणी एकता भरत पटेल (वय २३, रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) हिचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. येरवडा भागातील शास्त्रीनगर भागात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. डंपर, टँकर, ट्रक अशा अवजड वाहनांमुळे गंभीर अपघात झाले आहेत. बहुतांश अपघात अवजड वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे झाले आहेत. अवजड वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.