आफ्रिकी देशांत जीवघेण्या ठरलेल्या इबोलाची साथ आणि भारतातील डेंग्यूचा प्रादुर्भाव यांमुळे आरोग्याचे बहुपदरी संकट अधोरेखित झाले आहे. इबोलाचे कारण पुढे करत आफ्रिकी देशांतील नेत्यांची भारतात आयोजित करण्यात आलेली परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय भारताने जाहीर केला आहे. त्याच वेळी येत्या काही दिवसांत दर आठवडय़ाला किमान दहा हजार नागरिक इबोलामुळे संकटात सापडण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली आहे. इबोलाचा संसर्ग झालेल्यांपैकी किमान पन्नास टक्के रुग्ण मृत्यूला सामोरे जात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल म्हणतो. आतापर्यंत ८९१४ जणांना या रोगाची लागण झाली असून त्यांपैकी ४४४७ जण दगावले आहेत. आफ्रिका खंडातील लायबेरिया, सिएरालिओन आणि गिनीया या देशांमध्ये इबोलाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने झालेला दिसून येतो. तेथे या साथीला सामोरे जाण्यासाठी पुरेशा आरोग्यसुविधा नाहीत. अनेक डॉक्टर आणि परिचारिकांनी तर अशा रुग्णांवर औषधोपचार करण्यास नकार दिला आहे, याचे कारण त्यांच्याही जीविताला धोका उत्पन्न झाला आहे. या रोगाची लागण झपाटय़ाने होत असून, त्याची वेगवान चाचणी तयार करण्यात इंग्लंडमधील संशोधकांना यश आल्यामुळे येत्या काही दिवसांत त्याचा योग्य परिणाम दिसू शकेल, अशी अपेक्षा आहे. जगातील सगळ्या विमानतळांवर आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत असली, तरीही त्याबद्दलची भीती कमी झालेली नाही. संसर्गजन्य अशा या भयानक रोगाने केवळ आफ्रिकी देशच नव्हे, तर प्रगत देशांचीही झोप उडाली आहे. तर दुसरीकडे, भारतासारख्या प्रगतिशील देशातही उच्चभ्रूंच्या वसाहतीमध्ये निर्माण झालेल्या डेंग्यूच्या संकटाला कसे सामोरे जायचे, याबद्दल अद्यापही पुरेशी स्पष्टता दिसून येत नाही. स्वच्छ पाण्यात किंवा साठलेल्या पाण्यात निर्माण होणाऱ्या डासांमुळे होणाऱ्या डेंग्यूमुळे भारतातील मुंबई, दिल्ली, भोपाळ, पुणे यांसारख्या शहरांमध्ये अनेक रुग्ण पीडित आहेत. ज्या देशाला गेल्या सहा दशकांमध्ये स्वच्छतेबाबत पुरेशी जागृती करता आली नाही, त्या देशातील सुजाण म्हणवल्या जाणाऱ्या नागरिकांनाही या रोगाने पछाडले आहे. डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या रोगांचे संकट परतवून लावणे हे मोठे आव्हान असून त्यासाठी जनजागृती आणि पुरेशा आरोग्यसुविधांचीच आवश्यकता आहे. मुंबईतील डेंग्यूच्या एकूण रुग्णांपैकी साठ टक्के लब्धप्रतिष्ठितांच्या वसाहतींमधील असल्याची माहिती, काळजी वाटावी अशीच आहे. नेपियन सी रोड, पेडर रोड, मलबार हिल यांसारख्या भागांमध्ये डेंग्यूने मोठे आव्हान निर्माण केले आहे. अशा रोगांबाबत महापालिका स्तरावर कार्यक्षम यंत्रणा नसल्याचे चित्र दिसते आहे. शहरांमधील आरोग्यसेवा प्रामुख्याने खासगी व्यवस्थांनी ताब्यात घेतली असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची व्यवस्था वेगाने कार्यरत होत नाही. कारण त्याबद्दल फारशी ओरडही होत नाही. फवाऱ्याची मलमपट्टी करून असे रोग आटोक्यात येत नाहीत. त्यासाठी सतत लक्ष ठेवून कारवाई करण्याची आवश्यकता असते. वाढते नागरीकरण, बदलत्या सवयी, वाढती लोकसंख्या, पिण्याचे पाणी आणि मैलापाणी यांचे अयोग्य व्यवस्थापन यामुळे अशा रोगांना सामोरे जाताना अनेक शहरांची फजिती होत आहे. जगातील शंभर देशांमध्ये वर्षभरात किमान एक कोटी नागरिक डेंग्यूने बाधित होत आहेत. जगातील सुमारे बावन्न टक्के नागरिक विविध प्रकारच्या साथींच्या रोगांनी बाधित असून ते केवळ आग्नेय आशियातील देशांचे नागरिक आहेत. हे चित्र बदलण्याचे आव्हान आता प्रगत देशांनीही पेलण्याचे ठरवले आहे. प्रत्येकाने त्याबाबतीत स्वत:ची जबाबदारी ओळखून कार्यरत होणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2014 रोजी प्रकाशित
आफ्रिकेत इबोला, भारतात डेंग्यू
आफ्रिकी देशांत जीवघेण्या ठरलेल्या इबोलाची साथ आणि भारतातील डेंग्यूचा प्रादुर्भाव यांमुळे आरोग्याचे बहुपदरी संकट अधोरेखित झाले आहे.

First published on: 16-10-2014 at 02:30 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ebola in africa dengue in india