18 September 2020

News Flash

मृणाल सेन यांचा चॅप्लिन

‘माय चॅप्लिन’ हे मृणाल सेन यांनी चार्ली चॅप्लिनविषयी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव आहे. या नावावरून कळते की सेन यांना त्यांना उमजलेला व भावलेला चॅप्लिन वाचकांपर्यंत पोचवायचा

| September 20, 2014 04:20 am

‘माय चॅप्लिन’ हे मृणाल सेन यांनी चार्ली चॅप्लिनविषयी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव आहे. या नावावरून कळते की सेन यांना त्यांना उमजलेला व भावलेला चॅप्लिन वाचकांपर्यंत पोचवायचा आहे. सेन यांनी १९५३ साली बंगालीतही चॅप्लिनविषयी याच नावाने पुस्तक लिहिले असले तरी हा त्याचा अनुवाद नाही. हे स्वतंत्र पुस्तक आहे.
मृणाल सेन (जन्म १९२३) हे मानवी मनाचा व जीवनाचा शोध घेणारे कलात्मक चित्रपट काढणारे दिग्दर्शक तर चॅप्लिन (१८८९-१९७७) हा वरकरणी विनोदी, पण अंतर्यामी सामाजिक विसंगतींवर उपरोधिक भाष्य करणारा विश्वविख्यात चित्रपट कलाकार व दिग्दर्शक. या दोघांच्या शैली वेगवेगळ्या, पण प्रखर सामाजिक जाणिवा एकसमान!
सेन यांनी ओघवत्या भाषेत चॅप्लिनच्या आयुष्याचा व चित्रपटसृष्टीतील प्रवासाचा आढावा तर घेतला आहेच, शिवाय  स्वत:चे अनुभव व संस्मरणेही सांगितली आहेत. त्याकरिता वेगळा टाइप वापरला आहे. अर्थात ही संस्मरणेही आकर्षक असल्याने आपण ती डावलू शकत नाही! उदाहरणार्थ, विशिष्ट देहबोली, जलद लयबद्ध हालचाली, मिशा, पोशाख, छडी इत्यादी ठरवून चॅप्लिनने त्याचा ‘ट्रॅम्प’ किंवा ‘व्हॅगॅबॉन्ड’ किंवा ‘आम आदमी’ साकारला याबाबतचे वर्णन करताना सेन यांना त्यांच्या गावातला (फरीदपूरचा) एक अनाथ पण क्रियाशील मुलगा (अकबर) आठवतो. मग सेन अपघाती मृत्यूपर्यंतचा त्याचा जीवनपट काहीशा अलिप्तपणे, पण बऱ्याचशा सहृदयतेने उलगडून दाखवतात. चॅप्लिनच्या ‘गोल्ड रश’ या मूकपटाबद्दल लिहिताना त्यांना स्वत:चा ‘आकाशकुसुम’ आठवतो; ज्यातील नायक वर्गभेद पार करून समाजात वर वर जाण्याची धडपड करतो. दोन ‘ट्रॅक्स’वर पुढे सरकणाऱ्या आकृतिबंधाचा वापर केल्याने हे पुस्तक वाचनीय झाले आहे.
चॅप्लिनच्या प्रदीर्घ (१९१४ ते १९६७) कारकिर्दीचा (किंवा ‘कला-किर्दी’चा) परामर्श घेताना सेन महत्त्वाच्या चित्रपटांतील विवक्षित दृश्यांमध्ये त्याने ध्वनी, छायालेखन, संपादन इ. पैलू कसे समर्थपणे हाताळले आहेत, ते सांगतात. आशय व अभिव्यक्ती चॅप्लिनच्या चित्रपटांमध्ये ‘हातात हात घालून चालतात’ असे सेन लिहितात.
या सचित्र पुस्तकात सहा प्रकरणे आहेत. त्यातील एक संपूर्ण प्रकरण ‘द ग्रेट डिक्टेटर’ (१९४०) या चित्रपटावर आहे. चॅप्लिनचा हा पहिला महत्त्वाचा बोलपट- ज्यात त्याने हिटलरच्या फॅसिस्ट राजवटीवर उपरोधिक, पण प्रखर प्रहार केले आहेत. चित्रपटातील फॅसिस्ट हुकूमशहा स्वत:ला उच्च ‘आर्यन’ वंशाचा मानून ज्यू-वंशीयांवर अत्याचार करतो. या बोलपटाने अमाप ख्याती मिळवली, पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चॅप्लिनच्या रशियाला समर्थन देणाऱ्या वक्तव्यांमुळे अमेरिकन शासन नाराज झाले. चॅप्लिन वारंवार सांगत राहिला की, ‘तो कलाकार आहे. कम्युनिस्ट नाही.’ परंतु ‘गैर-अमेरिकन’ कारवाया रोखण्यासाठी केलेल्या कायद्याची मदत घेऊन अमेरिका चॅप्लिनच्या मागे एफबीआय (फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन)चा ससेमिरा लावते. परिणामत: १९५२ साली चॅप्लिनने अमेरिकेला रामराम ठोकतो. या सगळ्या घडामोडी सेन यांनी जिव्हाळ्याने व तन्मयतेने नोंदवल्या आहेत.
१९१४ नंतर चॅप्लिनने अनेक संस्मरणीय मूकपट बनवले. (उदा. ‘शोल्डर आम्र्स’, ‘द किड’, ‘अ वुमन ऑफ पॅरिस’, ‘द गोल्ड रश’, ‘सिटी लाइट्स’, ‘मॉडर्न टाइम्स’ इत्यादी). १९२८ साली चित्रपटात आवाजांचा समावेश करणे शक्य झाले. मूकपटांचा काळ संपला, बोलपटांचा जमाना सुरू झाला. पण प्रभावी ‘पॅन्टोमाइम’मध्ये पारंगत असलेल्या आणि केवळ मूकपटातील अभिनयाद्वारे असामान्य असा ‘सामान्य माणूस’ साकारणाऱ्या चॅप्लिनला चित्रपटांमध्ये ध्वनीचा स्वीकार करणे जड गेले. अखेरीस त्याने ‘द ग्रेट डिक्टेटर’सारखा भेदक बोलपट बनवला, ही गोष्ट अलाहिदा. तथापि, मूकपट व बोलपट यांच्या गुणावगुणांविषयी वाद-संवाद झाले व होत आहेत. या विषयाचा ऊहापोह करून सेन यांनी ‘बोलपट व मूकपट या दोहोंकडे स्वतंत्र कलाविष्कार म्हणून पाहता येईल’ अशा स्वरूपाच्या सत्यजित राय यांच्या मताचा आवर्जून उल्लेख केला आहे.
सप्टेंबर १९३१ मध्ये ‘सिटी लाइट्स’च्या प्रीमियरकरिता चॅप्लिन लंडनला आला होता. तेव्हा महात्मा गांधींचा मुक्काम तेथेच असल्याचे त्याला कळले. तेव्हा खटपट करून चॅप्लिनने त्यांची भेट घेतली. तोपर्यंत चॅप्लिन ख्यातिप्राप्त असूनही गांधींना तो कोण आहे हे माहीतदेखील नव्हते. या गांधी-चॅप्लिन भेटीचे सेन यांनी आस्थेने वर्णन केले आहे.
चॅप्लिनचे आणखी दोन महत्त्वाचे बोलपट म्हणजे ‘मॉन्सीओ व्हरदू’ (१९४७) व ‘लाइम लाइट’ (१९५२). या दोन्हींचे विस्तृतपणे रसग्रहन करताना सेन यांनी भोवतालची राजकीय परिस्थिती व टीकाकारांची मते आदी पैलूंवरही प्रकाश टाकला आहे. वस्तुत: चॅप्लिनची कला (किंवा बहुधा कोणतीही कला) समाज व राजकारण यांच्यापासून अलिप्त राहू शकत नाही, हे या पुस्तकातून ठायीठायी जाणवते.
सेन हे चॅप्लिनच्या वैयक्तिक व वैवाहिक जीवनात फार डोकावत नाहीत. अर्थात चॅप्लिन १९ वर्षांचा असताना १५ वर्षीय हेटीकडे कसा आकर्षित झाला, पण ही प्रणयकथा कशी अधुरी राहिली, हे त्यांनी सांगितले आहे. चॅप्लिनची चतुर्थ-पत्नीऊना आणि कन्या जेराल्डीन या पुस्तकात अधूनमधून येतात.
सेन यांनी या पुस्तकात चॅप्लिनने लिहिलेली एक दुर्मीळ लघुकथा -‘ऱ्हिदम्’-समाविष्ट केली आहे. अनेक दिवस तिच्या शोधात होते. अखेरीस कलकत्त्याची नॅशनल लायब्ररी पालथी घातल्यावर त्यांना ती मिळाली! १९३८च्या स्पेनमधील यादवी युद्धाच्या पाश्र्वभूमीवरील ही कथा मानवी असहायतेचे व भीषणतेचे दर्शन घडवते.
चॅप्लिन काय किंवा मृणाल सेन काय, दोघेही कथा  लिहिताना किंवा वाचताना तिचे ‘सिनेमॅटिक’ पैलू जोखत असणार! त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातूनही ‘सिनेमॅटिक’ दृष्टी मिळेल अशी आशा आहे.
माय चॅप्लिन : मृणाल सेन,
न्यू एज पब्लिशर्स, कोलकाता,
पाने : १६८, किंमत : ३७५ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 4:20 am

Web Title: my chaplin mrinal sen
Next Stories
1 साहित्य अकादमीचा चित्रमय इतिहास
2 विशलिस्ट
3 आल्हादक पुनर्भेट
Just Now!
X